मार्च २०२५ पासून हार्बर लोकल बोरिवलीपर्यंत धावणार?

92
दिवसागणिक वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने परिवहन विभागाला लिहिलेल्या पत्रातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विस्तारीकरणानंतर प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते बोरिवली आणि पनवेल ते बोरिवली असा थेट प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

८२५ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार

सध्या हार्बर रेल्वे सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव या दरम्यान धावतात. एमयूटीपी-३ अंतर्गत हार्बर मार्गाचे विस्तारीकरण बोरिवलीपर्यंत करण्याची योजना आहे. गोरेगाव ते बोरिवली या सात किमीच्या अंतराच्या विस्तारासाठी अंदाजे ८२५ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. उपलब्ध जागा लक्षात घेऊन गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्ग काही ठिकाणी उन्नत करण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपासून विरारपर्यंत करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे नियोजन आहे.

सहाव्या मार्गिकेचे काय झाले?

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहाव्या रेल्वे मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खार ते गोरेगाव दरम्यानचा मार्ग मार्च २०२३ पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव ते बोरीवली मार्ग मार्च २०२४पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.