- वंदना बर्वे
हरियाणातील ९० जागांसाठी १०३१ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास २ कोटी मतदार आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी मतदान करणार आहेत. यात मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्यापर्यंत आणि चौटाला कुटुंबापासून ते सुरजेवाला यांच्यापर्यंत सर्वच उमेदवारांची झोप उडाली आहे.
हरियाणाच्या २२ जिल्ह्यांतील ९० जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. एकूण १०३१ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास दोन कोटी तीन लाख मतदार शनिवारी आपल्या अधिकाराचा उपयोग करून हरियाणाचे नवीन सरकार निवडणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री नायब सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, ज्येष्ठ इनेलो नेते अभय सिंह चौटाला आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासारख्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Haryana Assembly Election)
नायब सैनी :
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या कुरूक्षेत्राच्या मैदानात गीता ऐकविली त्याच कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सैनी निवडणूक लढत आहेत. मुख्यमंत्र्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेसने विद्यमान आमदार मेवा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय आपने जोगा सिंग उमरी, जेजेपीने विनोद कुमार शर्मा आणि इंडियन नॅशनल लोक दलाने सपना बादशामी यांना रिंगणात उतरविले आहे. २०१९ मध्ये मेवा सिंग यांनी भाजपाचे पवन सैनी यांचा १२६३७ मतांनी पराभव केला होता. मुख्यमंत्री सैनी सध्या कर्नालहून आमदार आहेत.
(हेही वाचा – Mantralaya : आदिवासी आमदार आक्रमक! मंत्रायालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारत केलं आंदोलन; नेमकं कारण काय ?)
भूपेंद्रसिंग हुड्डा :
हरियाणातील दुसरी हॉट सिट म्हणजे गढी-सांपला-किलोई. रोहतक जिल्ह्यातील या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा मैदानात आहेत. भाजपाने जिल्हा परिषद अध्यक्षा मंजू हुडा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये हुड्डा यांनी भाजपाचे सतीश नंदल यांचा ५८३१२ मतांनी पराभव केला होता. भूपेंद्र हुड्डा येथून पाच वेळा विजयी झाले आहेत. यापूर्वी वडील रणवीर सिंग हुड्डा १९६८ मध्ये येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
दुष्यंत चौटाला :
२०१९ च्या निवडणुकीनंतर किंगमेकर ठरलेले माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला उचाना कलान येथून मैदानात आहेत. जिंद जिल्ह्यातील हा सर्वाधिक हॉट मतदारसंघ. मागच्या निवडणुकीत चौटाला यांनी भाजपाच्या प्रेम लता यांचा ४७४५२ मतांनी धुव्वा उडविला होता. आता दुष्यंत यांचा सामना काँग्रेसचे माजी खासदार ब्रिजेंद्र सिंह यांच्याशी आहे. याशिवाय, भाजपाचे देवेंद्र चतुर्भुज अत्री, आपचे पवन फौजी आणि इनेलोचे विनोद पाल सिंग दुलगंच हेही मैदानात आहेत. (Haryana Assembly Election)
अभय सिंह चौटाला :
माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू अभय सिंह चौटाला यांनी पुन्हा एकदा सिरसा जिल्ह्यातील एलेनाबाद मतदारसंघातून दंड थोपटले आहे. भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अभय सिंह चौटाला यांचा सामना भाजपाचे अमीर चंद तलवारा आणि काँग्रेसकडून भरतसिंह बेनिवाल यांच्याशी आहे. अभय सिंह चौटाला यांनी जानेवारी २०२१ मध्ये कृषी कायद्यांविरोधात राजीनामा दिला होता. यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
अनिल विज :
हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज अंबाला कँटमधून निवडणूक लढवित आहेत. यामुळे या जागेची चर्चा जास्त आहे. या ठिकाणी तिरंगी लढत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे, सहा वेळेचे आमदार अनिल विज रिंगणात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक परविंदर सिंग परी रिंगणात आहेत. याशिवाय काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार चित्रा सरवरा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. विज यांनी गेल्या निवडणुकीत कॉग्रेसच्या चित्रा सरवरा यांचा २०,१६५ मतांनी पराभव केला. (Haryana Assembly Election)
(हेही वाचा – Cabinet Decision : पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता)
गोपाल कांडा :
हरियाणातील सिरसा हा एकमेव असा मतदारसंघ आहे जेथे भाजपाने उमेदवार दिलेला नाही. येथून गोपाल कांडा निवडणूक लढवत आहेत. मागची निवडणूक त्यांनी अवघ्या ६०२ मतांनी जिंकली होती. आता कॉंग्रेसचे गोकुळ सेटियाशी त्यांचा सामना होणे आहे.
सावित्री जिंदाल :
भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल मैदानात असल्यामुळे हिसार हा हरियाणातील हाई प्रोफोईल मतदारसंघ बनला आहे. या भागात जिंदाल कुटुंबाचे वर्चस्व आहे. १९९१ ते २००९ पर्यंत झालेल्या पाचही निवडणुका जिंदाल कुटुंबाने जिंकल्या आहेत. ओपी जिंदाल तीनदा तर सावित्री जिंदाल दोनदा विजयी झाल्यात. आता सावित्री जिंदाल यांचा सामना भाजपाचे दोन वेळचे आमदार डॉ. कमल गुप्ता यांच्याशी आहे.
विनेश फोगट :
जुलाना हा आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ. येथून दोन-दोन महिल कुस्तीपटू रिंगणात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगटला कॉंग्रेसने मैदानात उतरविले आहे तर भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. आपने डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू कविता दलाल यांना तिकीट दिले आहे. दलाल हिला हरयाणात ‘लेडी खली’ म्हणून ओळखले जाते. (Haryana Assembly Election)
रणजीत चौटाला :
माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे चिरंजीव रणजीत चौटाला सिरसा जिल्ह्याच्या रानिया मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत. त्यांनी भाजपाला तिकीट मागितले होते. परंतु, उमेदवारी मिळाली नाही. यामुळे भाजपाचा राजीनामा देत रणजीत चौटाला यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने येथून शीपाल कंबोज यांना तिकीट दिले आहे. इनेलोने येथून अभय चौटाला यांचे चिरंजीव अर्जुन चौटाला यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये सुद्धा रणजीत चौटाला अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यांनी गोविंद कांडा यांचा १९४३१ मतांनी पराभव केला होता.
आदित्य सुरजेवाला :
कैथल विधानसभा सुद्धा खास आहे. कारण, राहुल गांधी यांच्या निकटचे कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचे चिरंजीव येथून मैदानात आहेत. भाजपाने लीला राम गुर्जर यांना मैदानात उतरविले आहे. आपने सतबीर सिंग गोयत आणि जेजेपीने संदीप गढ़ी यांना तिकीट दिले आहे. २०१९ मध्ये रणदीप सुरजेवाला यांचा अवघ्या १२४६ मतांनी पराभव झाला होता. (Haryana Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community