कोल्हापुरात मंगळवारी किरीट सोमय्या यांनी अक्षरशः धुडगूस घातला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापुरात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यानंतर मात्र हसन मुश्रीफ यांनी यावर आक्षेप घेतला. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. त्यांचे नाव सातत्याने घेऊ नका. हे काही बरोबर होणार नाही, असे मुश्रीफ पत्रकार परिषदेत म्हणाले.
काय म्हणाले मुश्रीफ?
किरीट सोमय्या यांनी ज्या कारखान्यांचे विषय बाहेर काढले, असे ते म्हणतात ते खरे तर दहा-अकरा वर्षांपूर्वीचे जुने कारखाने आहेत. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही तरी काढा, असे आपण सोमय्या यांना सांगत होतो. पण त्यांनी एक ‘जावई’ शोध लावला आणि आज आणखी एक घोटाळा बाहेर काढला. त्यात आपल्या जावयाचे नाव घेतले. आपण त्यांना सूचना करतो की, सोमय्या हे आपल्या जावयाचे नाव आणि कुटुंबीयांचे नाव सातत्याने घेत आहेत. हे काही बरोबर नाही. ज्याचा कशाचाही संबंध नाही. माझा जावई स्वत:चा व्यवसाय करत आहे. त्यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सोमय्या करत आहेत. हे निषेधार्ह आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
(हेही वाचा : औरंगाबादमधून शिवसेना-भाजपाचे मनोमिलन होणार?)
१०० कोटींचा दावा दाखल
आपण सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. मात्र त्यांनी पुन्हा अशी बदनामीकारक वक्तव्ये करू नये म्हणून त्यांच्यावर बंदी आणण्यासाठी आपण याचिकाही दाखल केली होती. आजच त्याची सुनावणी सुरू होती. पण त्याची नोटीस त्यांनी घ्यायला नकार दिला. म्हणून या प्रकरणावर सुनावणी होऊन त्यावर एकतर्फी निर्णय येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करायचे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. जर ७ दिवसांत मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर आपण वरच्या न्यायालयात जाणार आहोत, असे सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community