दादरमधील ज्या फेरीवाल्यांच्या म्होरक्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी तीव्र आंदोलन केले होते आणि त्यांना दादरमध्ये यापुढे पाय ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता, तोच म्होरक्या पुन्हा एकदा दादरमधील सेनापती बापट मार्गावर दिमाखात व्यवसाय करताना दिसत आहे. भाजपच्या आंदोलनानंतर फरार असलेला हा नेता खंडणीच्या तक्रारींनंतर अटकेत होता. परंतु जामीनावर बाहेर आल्यानंतर जमाल आणि त्यांच्या भावासह मुलांनेही पुन्हा एकदा भाजीच्या व्यावसाय करत आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपचे हे आंदोलन कशासाठी आणि कुणासाठी होते असा सवाल आता दादरकर विचारत असून जमालने कमाल केल्याने फेरीवाले जोमात आहेत आणि भाजपचे नेते मात्र कोमात गेल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : जपानमध्ये पंतप्रधानांच्या सभेत स्फोट! फुमियो किशिदांना सुखरूप काढले बाहेर )
दादरमध्ये रोहिंग्यो मुसलमान तसेच बंगाली मुसलमान यांची संख्या अधिक असून या फेरीवाल्यांचा म्होरक्या असलेल्या जमाल आणि त्यांच्या भावाविरोधात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, भाजपचे सचिव जितेंद्र राऊत यांनी दादर स्थानकाबाहेर आंदोलन करून या बंगाली मुसलमांना हटवा अशाप्रकारची मागणी केली होती. या आंदोलनात बोलतांना शेलार यांनी जमाल यांची कुंडली वाचून दाखवताना अनेक दलालांची नावेच जाहिर केली होती. त्यानंतर जमाल हा दादरमध्ये फिरकलाच नव्हता. तेव्हापासून दादरमधील भाजीचे व्यवसाय बंद होते. त्यानंतर या जमाल आणि त्यांच्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांना खंडणीप्रकरणात अटक करण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांच्या शिक्षेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. परंतु जामिनावरून बाहेर येताच जमाल हा दादर परिसरात दिसू लागला असून सेनापती बापट मार्गावर पुन्हा त्यांचे फेरीचे व्यवसायही सुरु झाले आहेत.
गावातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून कमी किंमतीत भाजी खरेदी करून आपण जास्त दराने विकणे आणि गाड्या उभे करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेणे अशाप्रकार जमाल आणि त्यांची माणसे करत असल्याची तक्रार भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी केली होती. यामध्ये आधीच जागा अडवून गावातील भाजी विक्रेत्यांना जागा मिळू न देत त्यांची अडवणूक करण्याचा प्रकार ही मंडळी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परंतु जामिनावर बाहेर येताच पुन्हा एकदा जमाल याचा हस्तक्षेप वाढू लागला असून फेरीवालेही त्यांच्या येण्यानंतर बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहे.
फेरीवाल्यांमध्ये असलेल्या कुजबुजीमध्ये तर जमाल यांनी आशिष शेलार यांची भेट दादरमधील वसंत स्मृतीमध्ये घेतल्याचे ऐकायला मिळत आहे. काही फेरीवाल्यांच्या मते तर जमाल यांनी भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तीमार्फत शेलार यांची भेट घेतली आणि त्या व्यक्तीचा आदर राखत शेलार यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शेलार यांनी जमाल याला काही मिनिटांची भेट देत त्याला यापुढे तुझ्या नावाची तक्रार आमच्याकडे येता कामा नये,असा दम करत व्यवसाय करण्यास हिरवा दिवा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच जमाल हा आता पुन्हा बिनधास्तपणे व्यवसाय करत असून ज्या जमालला दादरमधून हद्दपार करण्यात येईल असा इशारा देणाऱ्या आशिष शेलार यांनी पुन्हा जमालवर सहानभूती दाखवल्याने दादरमधील त्यांच्या पुन्हा येण्याने दादरकर नाराज आहे. काही फेरीवालेही नाराज आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनानंतर स्थानिक नागरिकांनीच दादरमध्ये फेरीचा व्यवसाय करावा अशी भूमिका घेणाऱ्या भाजपच्या या नव्या भूमिकेमुळे दादरकरांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शेलारांना पटवण्यात यशस्वी ठरलेल्या जमालला पुन्हा दादरमध्ये उभे राहण्याची हिंमत मिळाली असून त्यामुळे फेरीचे व्यवसाय पुन्हा जोरात सुरु आहे. परंतु ज्या भाजपने याला विरोध केला होता, त्या भाजपच्या भूमिकेवरच आता रहिवाशी संशय व्यक्त करताना दिसत असून जर रेल्वे स्थानकापासून दादरमधील १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करू शकत नाही, तर मग आंदोलनाची नौटंकी कशाला करायची होती,असा सवाल खासगीत दादरकर विचारताना दिसत आहेत.
Join Our WhatsApp Community