राहुल गांधींना आरोग्य मंत्र्यांनी दिला ‘बूस्टर डोस’! म्हणाले, त्यांना काही समजत नाही

राहुल गांधींच्या ट्वीटला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

135

भाजपद्वेषाचं इंजेक्शन टोचून घेतल्याप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी कायमंच वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर आरोप करत असतात. आजकाल तर त्यांना भारतीयांच्या लसीकरणाचा अचानक पुळका आला आहे. लसीकरण मोहिमेत केंद्र सरकार अपयशी आहे असे (बिनबुडाचे) आरोप ते सतत करत आहेत. पण या आरोपावरुन आता त्यांना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी चांगलेच कडवट डोस पाजले आहेत.

सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवावेत, त्याप्रमाणे राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करणारी टीव-टीव करत असतात. शुक्रवारी सकाळी त्यांनी असंच एक ट्वीट केलं ज्यात

जुलै महिना आला, पण अजून लस आली नाही

असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यांच्या या ट्वीटला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

(हेही वाचाः अखेर सोसायट्यांमध्ये होणाऱ्या लसीकरण मोहिमांसाठी नियमावली तयार!)

काय आहे हर्षवर्धन यांचं ट्वीट?

राहुल गांधींच्या या ट्वीटला उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन यांनी हल्लाबोल केला आहे.

“मी कालंच जुलै महिन्यातील लसींच्या उपलब्धतेबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. राहुल गांधी यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते वाचंत नाहीत, का त्यांना काही समजत नाही?, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला आहे.

उद्धटपणा आणि दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीसाठी कोणतीही लस नाही”,

असा टोलाही त्यांनी लगावला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने आपल्या नेतृत्त्वाबाबत जरुर विचार करायला हवा, असे म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः लसीकरणावरुन राहुल गांधींनी केलं ट्वीट… नेटक-यांनी छेडले ट्विटर वॉर)

जून महिन्यात दिले 11.50 करोड डोस

डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत. पण प्रत्यक्षात लसीकरणाची आकडेवारी बघितली तर लोकांसमोर या नेत्यांचा खोटेपणा उघड होईल, असे हर्षवर्धन यांनी गुरुवारी सांगितले होते. 75 टक्के लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारल्यापासून जून महिन्यात 11.50 करोड डोस केंद्र सरकारमार्फत पुरवण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली होती.

पियुष गोयल यांनीही दिली समज

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा राहुल गांधी यांना समज दिली आहे. जुलै महिन्यात 12 करोड लसी उपलब्ध होणार असून, त्यांचा पुरवठा राज्यांना करण्यात येणार आहे. 15 दिवसांपूर्वीच राज्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत राजकारण करणे योग्य नाही, हे राहुल गांधी यांनी समजायला हवे, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

(हेही वाचाः पुण्यातून होणार घरोघरी लसीकरणाला प्रारंभ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.