राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतर अनेकांना याला विरोध दर्शवला. यासंदर्भात आज पुन्हा एकदा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं विधान केले आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत मंत्रीमंडळात चर्चा सुरु आहे. शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही राजशे टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण
कोरोना लसीकरण मोहिमेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राजेश टोपे म्हणाले, 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे, लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. तर 90 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. 62 टक्क्यांपर्यंत लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जे लोकं लस घेत नाहीत त्यांच्यासाठी जनजागृती करुन लस दिली जाईल.
केंद्र लस उपलब्ध करुन देत नाही असे आम्ही बोललो नाही
60 लाख मुलांचे लसीकरण करायचं आहे, त्यासाठी कोवॅक्सिन आवश्यक असून बुस्टर डोस लसीकरणही सुरु झालेले आहे ते देणे गरजेचे आहे. आम्ही महिन्याचे हिशोब करुन 50 लाख कोविशिल्ड मागणी केली होती. केंद्र आम्हाला लस उपलब्ध करुन देत नाही असे कधीच आम्ही बोललो नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असेल तिथं जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्यांना लसीकरणासंदर्भात पावलं टाकण्यास सांगण्यात आलं आहे.