आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’

शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. ‘चला मुलांनो शाळेत चला’, या अभियानांतर्गत ग्रामीण भागात ५वी ते ७ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली होती. मात्र आता अवघ्या 24 तासांत या निर्णयाला राज्य सरकारने ब्रेक दिला आहे. शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय म्हणाले टोपे?

शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलं आहे. राज्यभरात त्या-त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेली टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल, असे टोपे म्हणाले.

(हेही वाचाः वर्षा गायकवाड शिक्षण खात्यात ‘नापास’?)

काय होता निर्णय?

शाळांमधील वर्ग भरण्यास आता सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगर, ठाणे मध्ये शाळा सुरु करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर काळजीग्रस्त असलेल्या शहरांमधील शाळा सुरु करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचना

  • शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत-कमी एक महिना संबंधित शहर, गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
  • गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या आवारात पालकांना प्रवेशास मनाई.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांत, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी.
  • मास्कचा वापर, साबणाने हात धुणे, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांला घरी पाठवून कोरोना चाचणी करून घेणे.
  • विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुक करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

(हेही वाचाः आघाडी सरकारची इयत्ता कंची? आशिष शेलारांची टीका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here