गर्दी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यातील वाईन शॉप आणि दारुच्या दुकानांमध्ये गर्दी होत असेल तर ती देखील बंद केली जातील, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येचा वाढता वेग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. उद्यापासून राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू होणार आहे.
भाजपच्या टीकेला आरोग्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
शनिवारी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर रविवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. सरकारला क्लासपेक्षा (शाळा) ग्लासची जास्त चिंता आहे, या भाजपच्या टीकेलाही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गर्दी होत असलेल्या सर्वच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत. मग दारू, वॉईग शॉपवर गर्दी होत असेल तर त्याच्यावर निर्बंध आणण्यात काहीच अडचण नाही.
(हेही वाचा –पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द, वाचा काय आहे कारण?)
राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल
राजेश टोपे यांनी पुढे असेही म्हटले की, सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी २७० मेट्रिक टनवरुन ३५० मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या १७०० ते १८०० मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा कोरोना विषाणू सौम्य स्वरुपाचा वाटत आहे. राज्यात निर्बंध अतिशय मोठ्या प्रमाणात लावले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community