शिवसेनेच्या ‘त्या’ मंत्र्यामुळे तरला भाजपचा मतदारसंघ

106

चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विजयी ठरल्या असल्या, तरी त्यांच्या या विजयात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पडद्यामागून मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यांनी चिंचवड मतदासंघात राबवलेली प्रचार यंत्रणा व मराठवाड्यातील स्थलांतरित मतदारांना आपलेसे करीत राबवलेले नेटवर्क कामी आले. त्यासोबतच या मतदासंघात असलेल्या त्यांच्या ‘जेएसपीएम’ या संस्थेच्या नेटवर्कचा फायदा झाला. त्यांच्या या कामगिरीमुळेच याठिकाणी भाजपला एक हाती विजय मिळवणे शक्य झाले तसेच आरोग्य मंत्री सावंत हेच विजयाचे शिल्पकार ठरले असल्याची चर्चा अधिवेशनात जोरात सुरू आहे.

( हेही वाचा : खोके…बोके…ओके…च्या घोषणा आल्या अंगाशी; प्रशासकांनी उद्धव गटासह इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात वाढीव निधी रोखला )

आरोग्य मंत्री सावंत व जगताप यांचे नातेसंबध सर्वश्रृतच आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूच्या दोन्ही मुली त्यांच्या सुना आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे पूर्वीपासूनचे नातेसंबध आहेत. या दोन्ही कुटुंबाचे बरेचसे नातेवाईक या भागात असल्याने प्रचार करीत असताना त्याचा मोठा त्यांना फायदा झाला. त्याशिवाय आरोग्य मंत्री सावंत यांनी २०१९ साली भूम, परंडा, वाशी या मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये ते विजयी ठरले होते. त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.

निवडणुकीसाठी यंत्रणा कशी राबवायची याची माहिती त्यांना असल्याने त्यांनी चिंचवड मतदारसंघात असलेल्या मराठवाड्यातील स्थालांतरीत मतदारांवर लक्ष केंद्रीत केले. त्यामध्ये जवळपास १५ ते २० हजार मतदार भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातील मतदार इकडे कामानिमित्त स्थालांतरीत झाल्याचे लक्षात आले. या सर्व सुमारे १५ ते २० हजार मतदारापर्यंत पोहचत त्यांना आपलेसे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अशी यंत्रणा राबवली.

त्याशिवाय त्यांच्या जेएसपीएम या संस्थेचे मोठ्या प्रमाणात पुणे, पिंपरी येथे कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या चिंचवड मतदारसंघात असलेल्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या नेटवर्कचा फायदा करून घेत सुमारे दहा हजार मतदारांचे मतदान करून घेतले.अशा सुमारे ३० हजार मतदानाची आघाडी जगताप यांना मिळवून देण्यात आरोग्यमंत्री सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय त्यांनी भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातील शिवसेनेचे संघटनात्मक पदाधिकारी व यंत्रणेला प्रचार कार्यात उतरावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्याचाही फायदा जगताप यांना झाला.

कलाटेंची उमेदवारी ठेवली कायम

चिचंवड मतदारसंघात तिरंगी लढत झाल्यास भाजपचा मार्ग सुकर ठरेल, अशा स्वरुपाचे आडाखे त्यांनी बांधले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार घोषीत झाल्यानंतर शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी लागलीच हे हेरून राहूल कलाटे यांची उमेदवारी कायम कशी राहील यासाठी प्रयत्न केले.

कसब्यात भाजपने मागितली नाही मदत

कसबा मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याठिकाणीही आरोग्यमंत्री सावंत यांची मोठी यंत्रणा कार्यरत होती, मात्र भाजपकडून त्यांच्याशी संपर्क साधला गेला नाही. अन्यथा त्याठिकाणी त्यांची मोठी मदत झाली असती, अशी चर्चा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.