रत्नागिरीतील चिपळूण येथे मुसळधार पावसामुळे पुराने थैमान घातल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासोबत पोहोचले होते. दरम्यान एकही अधिकारी यावेळी उपस्थित नसल्यामुळे नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी सर्वांसमोर आधी फोनवर आणि नंतर समोरासमोर अधिकाऱ्यांना झापल्याचे सर्वांनी पाहिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता भारती पवार यांनी देखील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असून, माझ्या दौऱ्याची राज्य सरकारने धास्ती घेतल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली आहे.
काय म्हणाल्या भारती पवार?
माझ्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिका-यांनी मला भेटणे अपेक्षित होते. जिल्ह्याची माहिती देणे अपेक्षित असताना तसे त्यांनी केलेले नाही. किमान जिल्ह्याची माहिती त्यांनी दिली असती तर जिल्ह्याच्या विकासासाठी मला प्रयत्न करता आले असते व आढावा घेता आला असता. मात्र महितीअभावी ते करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या दबावाखाली येऊन जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणांनी माझी भेट व आमचा दौरा टाळल्याचा आरोपही शेवटी भारती पवार यांनी केला. पालघरच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागल्याने त्यांनी हे वक्तव्य केले. पालघरमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा नियोजनशून्य कारभार या निमित्ताने पहावयास मिळाला, असा टोलाही भारती पवार यांनी या वेळेस लगावला.
(हेही वाचाः मला भेटायला येऊ नका…. का चिडल्या पंकजाताई?)
भारती पवार यांचा दौरा
माझ्या दौऱ्यात राज्य शासनाने आकस ठेवून मला सुविधा पुरवली नाही, सुविधा पुरवणे हे त्यांचे काम होते. मात्र, तसे झाले नाही. भारती पवार पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहिल्याच दिवशी त्यांनी पालघरमधील हुतात्मा स्तंभ या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन करत आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मनोर येथील वाघोबा खिंड परिसरातील आदिवासींची दैवत असलेल्या वागोबा मंदिराचे दर्शन घेतले व तेथून मनोर व पुढील दौऱ्याला निघाल्या आहेत.
(हेही वाचाः टास्क फोर्समध्ये अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करा! संदीप देशपांडेंची मागणी )
Join Our WhatsApp Community