गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सभागृहात दिली.
विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
अस्मिता योजना पुन्हा सुरू करणार
अस्मिता योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
- ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.