सर्वोच्च न्यायालयात परमवीर सिंगांना मिळणार का दिलासा?

आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणाची चौकशी करावी, अशी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय किशन आणि आर सुभाष रेड्डी या दोन न्यायाधीशांच्या खंडपिठासमोर उद्या सुनावणी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी वाझे यांना वसुलीचे टार्गेट दिल्याचे गंभीर आरोप केले होते. ते आरोप मात्र अनिल देशमुख यांनी फेटाळले आहेत. त्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

काय होती याचिका?

गृहमंत्र्यांनी चौकशी झाल्याचे कारण देत आपल्याला मुंबई आयुक्त पदावरुन पायउतार केल्याचे सांगितले होते. पण
मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कुठल्याही प्रकारची चौकशी एटीएस किंवा एनआयएकडून झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणाची चौकशी करावी, अशी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

(हेही वाचाः चौकशी वाझेपर्यंत सीमित ठेवण्याचे कारस्थान! रविशंकर प्रसाद यांचा आरोप )

देशमुखांनी फेटाळले आरोप

परमबीर सिंग यांनी पत्रात केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत असताना आता त्यांनी या बाबतीत एक नवा खुलासा केला आहे. मला कोविड झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होतो. त्यानंतर मी थेट १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी होम क्वारंटाईन होतो व त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी मी पहिल्यांदाच सह्याद्री अतिथी कक्ष येथे बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

ठाकरे सरकार करणार चौकशी?

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप गंभीर असून, यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा देखील मलीन होऊ लागली आहे. याचमुळे परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जरी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी देखील सध्या अनिल देशमुख हेच गृहमंत्री राहणार आहेत. मात्र येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here