राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली आहे. दरम्यान शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद झाल्यानंतर आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा सुनावणी होऊन, त्याबाबतचा निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणा-या या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बुधवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीन कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या युक्तिवादात शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
मूळ शिवसेनेवर हक्क नाही- सिब्बल
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी दोन तृतीयांश आमदारांचा गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाहीत असे म्हटले आहे. राज्यघटनेतील परिशिष्ट 10 चा दाखला देत सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला आहे. परिशिष्ट 10 मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांनी दुस-या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे योग्य असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मूळ शिवसेनेवर कोणताही हक्क नसल्याचे सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.
पक्षांतरबंदीबाबत निर्णयाचा अधिकार अध्यक्षांना- साळवे
दरम्यान, शिंदे गटाच्या वकिलांकडून देखील या युक्तिवादाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत म्हणजेच त्यांनी बहुमत गमावलं असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला आहे. तसेच पक्षांतरबंदी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांना आहे त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे हे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community