सत्तेच्या सिहासनांवर येत्या ५ डिसेंबरला महायुती विराजमान होणार आहे. परंतु, शिवसेनेने (Shivsena) महत्वाच्या खात्यांवर दावा केल्याने महायुतीत धुसफूस सुरू आहे. कोणाला किती मंत्रिपदे दिली जाणार यावर अद्याप एकमत झाले नसताना, शिवसेनेतील अनेकांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वादग्रस्त मंत्र्यांना डावल्याचे थेट निर्देश दिल्याने शिवसेनेत मंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री येत्या निवडणुकीत निवडून आल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून मागील ९ दिवसांपासून खल सुरू आहे. शिवसेना (Shivsena) नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. दिल्ली स्तरावर याबाबत अनेकदा खलबत झाली. अखेर अदृष्य हातांनी यात मध्यस्थी केल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून शिंदे यांनी माघार घेण्याचा संकेत देत, गृहमंत्री पदासह अर्थमंत्री, विधानसभा अध्यक्ष पदासाठी हट्ट धरला. शिंदे यांच्या नाराजीमुळे सत्ता स्थापनेचा त्यामुळे पेच निर्माण झाला. भाजपने १०६ आमदार असताना, अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला दिल्याचा दाखला देत, शिंदे यांची नाराजी मोडून काढली. तसेच ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी असल्याचे घोषणा केली.
महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला किती खाती मिळणार याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. मात्र, शिवसेनेतील अनेक उमेदवारांनी मंत्रिपदासाठी फिल्डींग लावत आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात मंत्रिपदापासून वंचित राहिलेले संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, रमेश बोरनारे, संजय गायकवाड, योगेश कदम यांच्यासह अनेकजण वर्षा निवासस्थानी ठाम मांडून आहेत. गोगावले यांना मागील सरकारमध्ये मंत्रिपदाची हमी मिळाली होती. संजय शिरसाट यांच्या विरोधामुळे ती हुकली. आता ५७ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये हमखास संधी मिळेल, असा गोगावले यांचा दावा आहे. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम यांच्याकडून सुध्दा जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना नव्या मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप आहे. मागील सरकारमध्ये चौघांची ही कामगिरी सुमार होती. सत्तार यांनी वारंवार आक्षपार्ह विधान करून सरकारची प्रतिमा मलीन केल्याचा भाजपचा आरोप आहे. तसेच नवीन मंत्रिमंडळात या माजी मंत्र्यांचा समावेश होऊ नये, याकरिता एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून प्रचंड दबाव असल्याचे समजते.
वरिष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांना मिळणार संधी
यंदा विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री विजय शिवतारे, अर्जून खोतकर, शिवसेनेचे (Shivsena) वरिष्ठ नेते राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, किशोर आप्पा पाटील, भाजपमधून सेनेत आलेले माजी मंत्री राजेंद्र गावित हे निवडून आले आहेत. पहिल्या पंसतीमध्ये प्रशासकीय अनुभव असलेल्या माजी मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नव्या चेहऱ्यांच्या आशेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community