राज्याच्या जीआरमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख! सोशल मीडियावर चर्चांना उधाण

186

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय जारी केला. या अधिकृत जीआरमध्ये पहिल्याच ओळीत हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्सला चर्चेसाठी नवा विषय आणि राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या या शासन निर्णयाने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहे. कारण हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा कधीच नव्हती. भारताने आजवर कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतात औपचारिक वापरामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा केवळ समज आहे परंतु आपल्या देशाला अधिकृत राष्ट्रभाषा नाही.

( हेही वाचा : बेस्ट बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी! ‘या’ मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी)

राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या या जीआरमध्ये हिंदीचा उल्लेख राष्ट्रभाषा असा करण्यात आल्याने सोशल मीडियावर काही जणांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत अनेकदा हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला गेला. परंतु भारत सरकारने हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे कधीही अधिकृतरित्या म्हटलेले नाही. केंद्र सरकारच्या अनेक सूचना, निर्देश, ठराव हिंदी आणि इंग्रजी भाषेतून निघत असल्याने तसेच हिंदी भाषिकांची संख्या तुलनेत काहीशी जास्त असल्याने अनेकांचा हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा समज झाला आहे. प्रत्यक्षात मात्र हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या जीआरमध्ये हिंदी राष्ट्रभाषा आहे असा झालेला उल्लेख वादाचे कारण ठरला आहे.

राज्य सरकारच्या जीआरमध्ये राष्ट्रभाषा हिंदी या उल्लेखाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या शासननिर्णयाच्या प्रस्तावनेतील पहिलंच वाक्य आहे “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे..” कधी जाहीर झाली हिंदी ही राष्ट्रभाषा? हिंदी ही इंग्रजीसोबतची शासनाची प्रशासकीय भाषा किंवा औपचारिक भाषा आहे असा आमचा समज आहे.. कृपया खुलासा करावा.. असे अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग सुद्धा करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.