सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपचे नेतेदेखील सहभागी झाले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. तसेच, या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचेही पाहायला मिळत आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलादेखील सहभागी झाल्या आहेत.
रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहादविरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेक-याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कात एकवटले आहेत.
( हेही वाचा: इंद्रायणी नदीत सोडले रसायनयुक्त पाणी; 6 कंपन्यांवर मोठी कारवाई )
भाजपसहित शिंदे गटही मोर्चात
या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदरा नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये या मोर्चात सामील झाले आहेत.
तसेच, या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकरही सहभागी झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईतील मोर्चात शिंदे गट आणि भाजप नेते एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे या मोर्चाचे महापालिका निवडणुकीशी कनेक्शन जोडले जात आहे.
Join Our WhatsApp Community