महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरे हे हिंदुत्वाचे मुद्दे मांडत आहेत. परंतु, भारतीय जनता पार्टी आणि भाजपाचे कार्यकर्ते ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतात तो संघ हिंदुत्वाचे हे मुद्दे सुरुवातीपासून मांडत आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा हे मुद्दे भाजपा सुरुवातीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. मुस्लिमांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी. हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांवर आक्रमण नाही पण त्याच वेळी त्यांचे लांगूलचालन ही नाही. कोणी मशिदीत जाणे अथवा नमाज पढण्याला विरोध नाही. पण एकाच्या धर्माचा आदर करताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. इतरांवर धर्म थोपविण्याची आवश्यकता नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
… याची सामान्य लोकांना जाणीव
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केल्याचे एका पत्रकाराने निदर्शनास आणले असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे भाजपाच्या हिंदुत्वाबद्दल काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही तर सामान्य माणूस काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. या देशातील हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने काय कार्य केले आहे याची सामान्य लोकांना जाणीव आहे.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडे राऊतांसारख्या लवंडे शिवसैनिकांची फौज! संदीप देशपांडेंचा हल्लाबोल)
भाजपाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत युती करून सत्ता मिळविल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याविषयी विचारले असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकत नाहीत आणि लोकशाही प्रक्रिया चालू शकत नाही असे वातावरण दहशतवाद्यांनी निर्माण केले असताना केंद्र सरकारने तेथे निवडणुका घेतल्या. निवडणुकीनंतर लोकशाही प्रक्रिया टिकविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तथापि, मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाची वाटचाल पाकिस्तानधार्जिणी असल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर भाजपा आघाडी सरकारमधून बाहेर पडली. काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली तर शिवसेनेची आघाडी सरकारमधून बाहेर पडायची हिंमत का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आस्तिक असावे की नास्तिक असावे अथवा देव मानावा किंवा न मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आपण त्याविषयी टिप्पणी करणार नाही.
Join Our WhatsApp Community