अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या हिरकणी कक्षातील असुविधांचा मुद्दा बराच गाजला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला फोन केला आणि त्यानंतर २४ तासांत अत्याधुनिक सोयीसुविधानियुक्त असा हिरकणी कक्ष विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आला.
( हेही वाचा : पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न! )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ५ महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता, त्यांना हिरकणी कक्षात असुविधाना तोंड द्यावे लागले. यासंदर्भात माहिती मिळताच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने आमदार अहिरे यांना फोन केला आणि येत्या २४ तासांत सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली होती.
त्यानुसार, मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड – पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज अहिरे व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला.
आरोग्यमंत्र्यांचे मानले आभार
हिरकणी कक्षात केलेल्या व्यवस्थेबद्दल सरोज अहिरे यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्यमंत्र्यांनी तत्परतेने तक्रारीची दखल घेत स्वतः जातीनिशी तक्रार निवारण केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महिला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष येत्या काळात प्रत्येक पोलीस स्थानकात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.