अंबानी प्रकरण एनआयएला देण्यासाठी केंद्राला सांगणार! – फडणवीसांचा सरकारला इशारा 

अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेल्या संशयास्पद वाहनाचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडला. विधानसभेत यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप - प्रत्यारोप झाले.   

अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयास्पद वाहनाचा मालक मनसूख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने, तसेच त्याचा पोलिसांतील नोंदवण्यात आलेला जबाब पाहता, हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याला नकार देत विरोधी पक्षांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का, असे सांगत विरोधी पक्षनेत्यांची मागणी नाकारली. त्यावर फडणवीस यांनी आम्ही केंद्र सरकारला सांगून हे प्रकरण परस्पर एनआयएने घ्यावे, अशी मागणी करणार असल्याचे विधानसभेत सांगितले.

काय म्हटले फडणवीस? 

ज्या दिवशी हिरेन याची गाडी गायब झाली, तेव्हा पोलीस अधिकारी सचिन वाझे हे क्रॉफर्ड मार्केट येथे कसे पोहचले? तिथे कोणती व्यक्ती त्यांना भेटली? या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यकडेच ७ दिवस होता, यात सचिन वाझेंचा काय रोल आहे?, असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेत मुख्य साक्षीदार हा मनसूख हिरेन हा होता. त्याला संरक्षण देणे अत्यावश्यक होते. मात्र त्याचे रक्षण करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा पोलीस जबाब आहे. ज्यात त्याने म्हटले आहे कि, ‘आपण ती गाडी ७ एप्रिल २०१८ रोजी सॅम म्युटन यांच्याकडून स्वतःच्या वापरासाठी घेतली होती, असे सांगितले होते, तरीही गृहमंत्री मात्र यात वेगळी माहिती देत आहेत. ती गाडी हिरेनच्या मालकीची नव्हती, ती म्युटनची होती, असे सांगितले आहे, तसेच हिरेनच्या मृतदेहावर कोणतीही जखम नाही, असे म्हटले आहे. वस्तुतः हिरेन याचा मृतदेह दोन्ही हात मागे बांधलेल्या अवस्थेत होता, आत्महत्या कुणी हात बांधून करत नाही’, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : अंबानींच्या इमारतीबाहेरील ‘त्या’ संशयास्पद वाहनाच्या मालकाचा मृत्यू! )

सचिन वाझेवरून सभागृह तापले! 

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास ठाणे आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत, त्यांच्यावर विरोधकांचा विश्वास नाही का? सुशांत सिंग राजपूत याचा तपास सीबीआय करत आहे. सहा महिन्यात सीबीआयने काय तपास केला, असा प्रश्न उपस्थित केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केल्यामुळे विरोधक सचिन वाझेला घाबरत आहेत का?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी विरोध केला. विरोधी पक्षनेते जेव्हा पुरावे देत गृहमंत्र्यांना हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची मागणी करतात, तेव्हा त्याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आम्हाला सचिन वाझे यांच्याशी काहीही संबंध नाही, ज्या अर्थी गृहमंत्री यात सुस्पष्ट माहिती देत नाहीत, यावरून यात काळेबेरे आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

अंबानी प्रकरण एटीएसकडे सोपवले!

गृहमंत्री मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेली गाडी ही मनसूख हिरेन यांच्या मालकीची नव्हती, तर ती गाडी त्याच्या ताब्यात होती. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here