भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करून देणार – मुनगंटीवार

138

भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास, अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होते. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली.

( हेही वाचा : रवींद्र नाट्य मंदिरात गर्जला “यशोयुताम् वंदे”चा नाद, वीर सावरकरांच्या रचनेवर आधारित कार्यक्रम)

‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड – १ ते १३’ या मोबाइल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे लोकार्पण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाइल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या १३ खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.

अॅपच्या लोकार्पणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुनगंटीवार म्हणाले, दार्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध केले, याचा आनंद आहे. आपण कितीही पुढे गेलो, तरी तरी इतिहास माहीत असणे गरजेचे आहे आणि तो वाचण्यासाठी मातृभाषेतून उपलब्ध असेल, तर ते आजच्या तरुणाईपर्यंत सहज पोहचू शकेल. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेले साहित्य लवकरच मराठीत भाषांतरित करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कलाकारांच्या हातून हास्यदानाचे ईश्वरी कार्य

आजच्या काळात कलाकार हा खूप मोठा आहे. कारण कला सादर करताना आपल्या समोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ते करतात. कलाकारांमुळे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम होत असून रक्तदान, अन्नदान याप्रमाणे हास्यदान पसरवण्याचे ईश्वरी कार्य कलाकार करत असून या कलाकारांच्या मागे सांस्कृतिक कार्य विभाग पाठीशी उभा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.