“विकास करायचा तर खासदार आपल्या विचारांचा हवा. केंद्राचा निधी कुठे, कसा, किती आणायचा याची पुरेपूर जाण असलेल्या खासदाराची या जिल्ह्याला गरज आहे आणि तो बहुजन विकास आघाडी देऊ शकते, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, आमदार हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा यांनी आज १८ मे ला दुपारी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केला. तर आमदार क्षितिज ठाकूर यांनी ९० टक्के खासदार निधी वाया जातो, हे लक्षात आणून दिले.
भाजपाने माजी आदिवासी विकास मंत्री दिवंगत विष्णु सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना पालघर या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले आहे. बविआने बोईसरचे स्थानिक आमदार राजेश पाटील तर शिवसेना उबाठाच्या भारती कामडी निवडणूक रिंगणात आहेत. पालघर मतदार संघात (Lok Sabha Election) सोमवारी २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. शनिवार, 18 मे रोजी संध्याकाळी ६ वाजता निवडणूक प्रचार थंडावणार असल्याने ही मुलाखत दुपारीच घेण्यात आली.
भाजपा आणि शिवसेना उबाठामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी लढाई
‘हिंदुस्थान पोस्ट’ने आज पालघर जिल्ह्याचा पालघर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेताना बहुजन विकास आघाडीचे प्रमुख ठाकूर हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी बातचीत केली. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार पालघर लोकसभा मतदार संघात बविआचा उमेदवार विजयी होणार असून भाजपा आणि शिवसेना उबाठामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी लढाई सुरु आहे. पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या जिल्ह्यात विकासासाठी बहुजन विकास आघाडी चांगला खासदार देऊ शकते, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election)
भाजपा हरतोय याची कल्पना त्यांना आली असावी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन-चार दिवसांपूर्वी नाव न घेता, ठाकूर यांच्यावर काही आरोप केले त्यामुळे नाराज झालेल्या ठाकूर यांनी भाजपा टीका केली. “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ २ सभा घेतल्या होत्या यावेळी २५ घ्याव्या लागल्या. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह गुजरात, राजस्थानचे आमदार, खासदार तर महाराष्ट्रातील सगळे बडे नेते पालघरमध्ये येऊन सभा घेतात, याचा अर्थ भाजपा हरतोय याची कल्पना त्यांना आली असावी,” असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. (Lok Sabha Election)
(हेही वाचा Gautam Gambhir : गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडून विचारणा?)
खुर्चीत असताना विरोध संपतो का
ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप करत त्यांना उघडे पाडले. सत्तेवर असताना पाठींबा आणि सत्ता गेल्यावर विरोध या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत ठाकूर म्हणाले, “सत्तेच्या खुर्चीत असताना विरोध संपतो का तुमचा? सत्तेत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य हे पर्यावरण मंत्री आणि सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना वाढवण बंदराच्या प्रकल्पासाठी १६,००० कोटी रुपयेयेणार म्हणाले होते. तुमचा प्रकल्पाला विरोध आहे तर तेव्हा हा प्रकल्प रद्द का नाही केलात? आता सत्ता गेल्यावर विरोध करत आहात,” असा प्रश्न ठाकूर यांनी केला.
मी पण हिंदूच आहे.
राम मंदिर या विषयावर बोलतानाही भाजपावर ठाकूर यांनी टीका केली. “मी पण हिंदूच आहे. आमच्याही मनात राम आहे, रोज पूजा करुन पाया पडूनच घराबाहेर पडतो. विकासावर मते मागा, राम का आणता राजकारणात?” असा सवालही ठाकूर यांनी केला.
९० टक्के खासदारांचा विकास निधी वाया जातो
हितेंद्र यांचे सुपुत्र आमदार क्षितिज ठाकूर यांनी खासदाराकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. ते म्हणाले, “खासदाराना निधीचा चांगला उपयोग करुन घेण्यास वाव आहे. ९० टक्के खासदारांचा विकास निधी वाया जातो. कामांसाठी निधी कसा मिळवायचा ते समजत नाही. ते समजले तर विकासाला खूप वाव आहे.” पालघरमध्ये रुग्णालय, शिक्षण, रोजगार, खारजमिन विकास, आरोग्य व्यवस्था अशा कामांना खूप वाव आहे. दापचेरी येथे ‘इंडस्ट्रीयल टाउनशिप’चा प्रस्ताव १० वर्षापूर्वी शासनाला दिला आहे मात्र पाणी, वीज आणि जमिन असूनही याबाबत निर्णय झाला नाही, अशी माहिती क्षितिज ठाकूर यांनी दिली. (Lok Sabha Election)
पंतप्रधान पदाचं काही अडत नाही
विरोधी पक्षांकडे पंतप्रधान पदाचा चेहेरा कुठला आहे? असे विचारले असता हितेंद्र ठाकूर म्हणाले, “देशात पंडित जवाहरलाल नेहरू नंतर काय? इंदिरा गांधी नंतर काय?राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न पडतो, पण आपल्या देशात अनेक कॅपेबल, हुशार माणसं आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदाचं काहीही अडत नाही,“ असे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले.
Join Our WhatsApp Community