गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना सुट्टी

155

गुजरातची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना, या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना सुट्टी देण्यात आली आहे. गुजरात सीमेलगतच्या पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! मुंबईत फक्त ९ रुपयात ५ फेऱ्यांचा बस प्रवास, असणार ‘ही’ एकच अट)

१ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यातील मतदारांना ही भरपगारी सुट्टी मिळणार आहे. सुट्टी शक्य नसेल, अशा खासगी कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे. राज्याच्या उद्योग, कामगार आणि ऊर्जा त्यासंबंधीचा शासन आदेश जारी केला आहे.

कोण पात्र?

गुजरात राज्यात मतदार असलेल्या, पण उपरोक्त चार जिल्ह्यांत काम करणाऱ्या चाकरमान्यांना ही सुट्टी वा सवलत मतदानासाठी दिली जाणार आहे. तेथील जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह गुजरात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही यासंबंधी कळविण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, काही आस्थापना, त्यातही खासगी कंपन्या आपल्या अधिकारी, कर्मचारी मतदारांना भरपगारी सुट्टी वा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागते. परिणामी मतदानाचा टक्का घसरतो. लोकशाहीसाठी ही बाब घातक असल्याचे उद्योग विभागाने आदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.