केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज, रविवारी रात्री मुंबईत आगमन होत आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून गुप्तचर संघटनांना देखील सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्यात ते प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार आहेत.
(हेही वाचा – Ganeshotsav 2022: पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन, मुंबईसह राज्यात प्रशासनाची जय्यत तयारी)
सालाबादप्रमाणे यंदाही ते मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतील, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीचीही चर्चा देखील रंगली आहे. मात्र ही शक्यता फार नसल्याचेही सांगितले जात आहे. अमित शाह हे मुंबईतील वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही मुंबई दौऱ्यादरम्यान हजेरी लावणार आहे.
शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शाह हे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईत येतात. मुंबई ही त्यांची जन्मभूमी असून मुंबईबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. ते या मुंबई भेटीत लालबागचा राजा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्या घरीही गणेश दर्शनासाठी येणार आहेत. ते मुंबईत असल्याने प्रदेश सुकाणू समिती व मुंबई प्रदेश पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, अशी आमची विनंती त्यांनी मान्य केली आहे. याशिवाय एल अॅण्ड टी कंपनीने उभारलेल्या शाळेचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे.