सचिन वाझेंच्या बाबतीत सरकारने घेतला निर्णय! गृहमंत्री म्हणाले…

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची क्राईम ब्रॅंच मधून बदली करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर भाजपकडून जोरदार आरोप करण्यात येत आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाझेंना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यामुळे विरोधकांच्या दबावामुळे राज्य सरकारने सचिन वाझे यांची क्राईम ब्रॅंचमधून बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानपरिषदेत गृहमंत्र्यांची घोषणा

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षाने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी लावून धरली. तेव्हा अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची क्राईम ब्रॅंच मधून बदली करण्यात येणार असल्याचे सांगितले.

(हेही वाचाः मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण : धनंजय गावडेंवरही आरोप! कोण आहेत गावडे? )

कालही विधानसभेत गोंधळ

मनसुख हिरेन यांच्या मृत्युमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आपल्या जबाबात केला आहे. त्यामुळे हा जबाब विधानसभेत वाचून दाखवत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार वाझेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप काल विधानसभेत केला. विरोधकांनी काल घोषणाबाजी करत, सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज नऊ वेळा स्थगित करण्यात आले.

प्रविण दरेकर आक्रमक

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या कायद्या सुव्यवस्थेच्या मुद्यावर निवेदन सादर केलं. पण त्यावेळी विरोधक आक्रमक झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांचं निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी वाझेंच्या बदलीचा निर्णय जाहीर केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here