मुंबई महापालिकेत सध्या भाजप आक्रमक असून सत्ताधारी पक्षावर आरोप तसेच टिकाटिप्पणी केली जात असतानाही शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिले जात नाही. विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्याचे काम हे सभागृह नेत्यांचे आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून सभागृह नेत्या प्रभावशील नसल्याने मुंबई महापालिकेत शिवसेनेची बाजू अजूनच कमजोर होत असून भाजपचे नगरसेवक हे वरचढ ठरताना दिसत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांचा ते प्रत्यक्षात समाचार घेत असले, तरी सत्ताधारी पक्ष म्हणून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना सभागृह नेत्या कमी पडताना दिसत आहे.
भाजपच्या टिकेला उत्तर मिळत नाही!
मुंबई महापालिकेत सध्या पहारेकरी असलेल्या भाजपकडून सत्ताधारी शिवसेना पक्षावर जोरदार हल्ला चढवत आरोप केले जात आहेत. परंतु या आरोपांचा समाचार घेताना शिवसेना पक्ष कमी पडताना दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध महाविकास आघाडी स्थापन होवून राज्यात ठाकरे सरकार विराजमान झाल्यानंतर अजूनच कमी झाला आहे. त्यामुळे या दोन पक्षांचा विरोध मावळला असला, तरी समाजवादी पक्षांकडूनही सत्ताधारी पक्षावर आरोप होत असतात. तसेच पहारेकरी असलेल्या भाजपकडून वारंवार सत्ताधारी शिवसेना पक्षाचा समाचार घेत प्रशासनासोबत त्यांच्यावर टिका केली जात आहे. परंतू भाजप पक्षाचा परखड शब्दांमध्ये समाचार घेतला जात नसल्यानेच महापालिकेतील भाजपचे नगरसेवक अधिकच आक्रमक बनल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : वृक्ष छाटणीच्या मुद्दयावरुन भाजपला श्रेय देणार, की त्यांचे पंख छाटणार?)
दिगंबर कांडरकर होते सर्वोत्तम सभागृह नेते!
कोरोनाच्या काळात महापौर आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षावर जोरदार टिका करण्यास सुरुवात झाली. परंतु सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषद घेवून किंवा प्रसिध्दी पत्रक काढून कधी भाजपचा समाचार घेतला, अशी नोंद कुठेही पहायला मिळणार नाही. या तुलनेत मागील २० वर्षांचा जर मागोवा घेतला, तर दिगंबर कांडरकर हे सर्वोत्तम सभागृह नेते म्हणून ओळखले जायचे. विरोधकांच्या आरोपांचा आणि टिकांचा समाचार घ्यायचे. शिवाय सभागृहातील वाक्तचातुर्याने प्रत्येक सदस्यांनाही प्रभावित करायचे. एवढेच नव्हेतर सभागृहातील मागील बाकावर बसणाऱ्या आणि चांगले वक्तृत्व असलेले तसेच विषयांची जाण असणाऱ्यांना पुढे आणण्याचेही काम त्यांनी केले होते.
प्रभाकर शिंदेंनी एकहाती सेनेची बाजू सांभाळली!
त्यानंतर आलेल्या प्रभाकर शिंदे यांनी एकहाती शिवसेनेची बाजू भक्कमपणे सांभाळली होती. सभागृहात शिंदे यांचा एक दरारा असायचा. परंतु पुढे पुढे आपल्याच नगरसेवकांना ते फारसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याप्रती रोष निर्माण झाला. प्रभाकर शिंदे यांचे वक्तृत्व हे प्रत्येक नगरसेवकांसाठी मार्गदर्शन करणारेच असायचेच. परंतु विरोधकांचाही ते शेलक्या भाषेत समाचार घ्यायचे की त्यांना नादाला विरोधी पक्षांच्या नेत्यांना लागताना दहावेळा विचार करावा लागत असे. परंतु शिंदे यांना हटवून जेव्हा सुनील प्रभू यांची निवड पक्षाने केली तेव्हाही त्यांनी पक्षाची भूमिका आणि सहकारी नगरसेवकांना विश्वासात घेतच काम केले. त्यामुळे ते सर्वाधिक काळ या पदावर राहू शकले.
(हेही वाचा : सभागृह नेत्यांबरोबर फाटल्यानंतर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष एकत्र)
सुनील प्रभू, यशोधर फणसे, तृष्णा विश्वासरावही होते कणखर!
सभागृह नेते पद भूषवताना पक्षाची योग्यप्रकारे भूमिका मांडणारे आणि या पदाला न्याय देणारे नेते अशीच प्रभू यांची ख्याती होती. त्यानंतर आलेल्या यशोधर फणसे हे शांत स्वभावाचे असले तरी सभागृहामध्ये तसेच सभागृहाच्या बाहेर त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा ज्याप्रकारे समाचार घेतला आहे, ते पाहता विरोधकही त्यावेळी दचकूनच असायचे. त्यांनी त्यावेळी विरेाधकांनाही वरचढ होवू दिले नव्हते. एवढेच नव्हेतर पहिल्या महिला सभागृह नेत्या म्हणून निवड झालेल्या तृष्णा विश्वासराव यांनीही विरोधकांना विश्वासात घेत त्यांना वरचढ होवू तर दिले नव्हते. प्रसंगी अरे ला कारे म्हणत उत्तरही दिले होते. त्यामुळे ज्याप्रकारे विश्वासराव यांनी सभागृह नेते पद सांभाळले.
सभागृह नेत्यांचे दालन कायम असते बंद!
त्या तुलनेत माजी आमदार असलेल्या आणि माजी महापौर असलेल्या विशाखा राऊत पहारेकऱ्यांचा समाचार घेताना कमी पडताना दिसत आहेत. सभागृहामध्ये जुने दाखले देवून ते बोलत असल्या तरी पहारेकऱ्यांचा त्यांच्याच भाषेत समाचार घेण्याची शैली त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे काही प्रमाणात वक्तृत्व असले, तरी विरोधकांचा समाचार घेताना काही मुद्दयांची व माहितीची कमी दिसून येते. पत्रकारांपासून चार हात दूर राहण्याचा राऊत यांचा स्वभाव असून त्यांचे दालनही बहुतांशी वेळी खुले नसते. त्यामुळे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष दालनात नसताना पक्षाचे नेते सभागृह नेत्यांकडे धाव घेतात. पण सभागृह नेत्यांच्या दालनाचे मुख्य दालन कायमच बंद असते आणि कर्मचारी बसत असलेल्या दालनातून त्यांचे कामकाज चालत असते. त्यामुळे अनेकदा लोकांना निराश होत माघारी परतावे लागते. त्यामुळे सभागृहात आपली चमक दाखवण्यात कमी पडणाऱ्या राऊत यांना विरोधकांचाही परखड शब्दांमध्ये समाचार घेता येत नसल्याने भाजपचे नगरसेवक आता अजून प्रभावीपणे सत्ताधारी पक्षावर वरचढ ठरताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : सर्वांना मोफत लस देण्याच्या मागणीसाठी भाजपचे महापौर दालनाबाहेर निदर्शने!)
मागील २० वर्षांतील सभागृह नेत्यांची नामावली
- सन २००० ते २००२: दिगंबर कांडरकर
- सन २००२ ते २००६ : प्रभाकर शिंदे
- सन २००६ ते २०१२ : सुनील प्रभु
- सन २०१२ ते २०१४ : यशोधर फणसे
- सन २०१४ ते २०१७ : तृष्णा विश्वासराव
- सन २०१७ ते २०१८ : यशवंत जाधव
- सन २०१८ ते आजपर्यंत : विशाखा राऊत