Bharat : भारत कसा झाला इंडिया? ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या शब्दांचा काय आहे इतिहास?

ब्रिटिशांनी सर्वात प्रथम भारताऐवजी इंडी(Indie) शब्द वापरला.

267

सध्या देशात भारत (Bharat) आणि इंडिया (India) या शब्दावरून वाद निर्माण झाला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले. ज्यावरून सध्या इंडिया विरुद्ध भाजपचा एनडीए अशी लढत सुरु झाली. अशा वेळी भाजपने आता इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिले आहे, ज्याला पारतंत्र्याचा वास आहे, असे सांगत देशाचे खरे नाव भारत आहे, असे म्हणत आहे. आता तर G20 च्या बैठकीसाठी सहभागी होणाऱ्या २३ देशांच्या प्रमुखांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निमंत्रण पाठवले आहे, ज्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिल्याने देशात या दोन शब्दांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. नेहमी देशात भारत किंवा इंडिया याबाबत वाद होत राहतात. अनेक लोक देशाच्या नावाबद्दल भिन्न मते व्यक्त करतात.  या पार्श्वभूमीवर भारत आणि इंडिया या दोन शब्दांचा  इतिहास काय आहे, हे पाहूया.

भारत नाव कसे पडले?

काही लोक म्हणतात की, भारत किंवा भारतवर्ष हे देशाचे खरे नाव आहे. असे म्हणतात की या देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरुन भारत देशाचे नाव देण्यात आले.

(हेही वाचा Bharat : ‘भारत माता कि जय’; देशाचे नाव बदलण्यास अमिताभ बच्चन यांचे अप्रत्यक्ष समर्थन )

काय आहे 17व्या शतकाचा इतिहास?

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, सिंधू नदीचे नाव इंग्रजीत इंडस झाले. आणि इंडस वरून इंडिया हा शब्द निर्माण झाला. त्यानंतर इंडिया या शब्दापासून इंडिका हा रंगाचा शब्द निर्माण झाला. 17व्या शतकात ब्रिटीश सरकारने इंडियाला स्वीकारले आणि नंतर हे नाव जबरदस्तीने लागू केले. ब्रिटीश हळूहळू भारत काबीज करीत होते आणि नावे बदलत होते. येथील वसाहतीच्या काळात त्यांनी इंडिया हा शब्द प्रचंड वापरला. यामुळे काही लोक अजूनही मानतात की इंडिया हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे.

इंडिया नावावर वादविवाद

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. सन 1949 मध्ये देशाची राज्यघटना तयार करण्यात आली होती. 17 सप्टेंबर1949 रोजी युनियनच्या नावे व राज्ये यावर चर्चा सुरू झाली. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी अर्ध्या तासात ते मान्य करावे अशी इच्छा व्यक्त केली. परंतु इंडिया आणि भारत सारख्या शब्दांमधील संबंध समजून घेण्यास इच्छुक असलेल्या इतर सदस्यांमध्ये नावाबद्दल मतभेद होते. यावर बरेच वादविवाद झाले आणि सेठ गोविंद दास, कमलापती त्रिपाठी, श्रीराम सहाय, हरगोबिंद पंत, हरी विष्णू कामथ या नेत्यांनी या चर्चेत भाग घेतला. हरि विष्णू कामथ यांनी सुचवले की इंडिया अर्थात भारतला भारत किंवा इंडिया मध्ये रूपांतरीत करण्यात यावे.

भारताचे इंडिया नाव कसे स्वीकारले?

त्यानंतर, सेठ गोविंद दास यांनी भारताच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करीत देशाचे नाव भारत ठेवण्याचा आग्रह धरला. यावर कमलापती त्रिपाठी यांनी मधला मार्ग काढला. ते म्हणाले की, त्याचे नाव इंडिया अर्थात भारत ऐवजी भारत अर्थात इंडिया ठेवले पाहिजे. हरगोविंद पंत यांनी आपले मत मांडले की ते नाव भारतवर्ष असावे, दुसरे कोणतेही नाही. परंतु या चर्चेनंतर इतर देशांशी असलेल्या संबंधांचा संदर्भ देऊन आणि देशातील प्रत्येकाला एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न करीत घटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये असे लिहिले गेले की इंडिया म्हणजे भारत एक संघराज्य असेल. तेव्हापासून त्या देशाला इंडिया आणि इथले लोक इंडियन म्हणून ओळखले जाऊ लागले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.