आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक! ४ राष्ट्रवादीचेच!

अनिल देशमुखांच्या आधी पद्मसिंह पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नारायण राणे या मंत्र्यांनाही अटक झाली होती.

महाराष्ट्राच्या इतिहासात मंत्र्यांना अटक होण्याच्या घटना तशा विरळच! पण तरीही माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची अटक पाहता आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात ५ मंत्र्यांना अटक झाल्याचे सकृतदर्शनी समोर येते आहे. विशेष म्हणजे त्यातील ४ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत.

खुनाच्या आरोपाखाली पद्मसिंह पाटील होते तुरुंगात!

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवनराजे आणि त्यांचे वाहनचालक या दोघांचाही मृत्यू झाला. यात सीबीआयने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तेव्हाचे नेते पद्मसिंह पाटील यांना २००९ मध्ये अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. मुंबईत सत्र न्यायालयात अजूनही खटला सुरु आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ होते गजाआड!

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्यावर महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याच्या आरोप झाला. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये भुजबळ यांना लाखो रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. न्यायालयाने आता त्यांना दोषमुक्त केले आहे. तरीही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा : अखेर माजी गृहमंत्री देशमुखांना अटक! ५ समन्सला टाळले होते)

मारहाणीच्या आरोपावरून जितेंद्र आव्हाडांना झालेली अटक!

घोडबंदर भागात राहणारे सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांचे अपहरण करून त्यांना स्वतःच्या बंगल्यावर आणून पोलिसांकरवी बेदम मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. या प्रकरणी आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर झाला.

अपशब्द उच्चारल्याने राणे होते अटकेत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात होती. एक दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here