केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकाधिक टक्का वाढवा यासाठी ज्या ज्या कारणांमुळे मतदार मतदान करू शकत नाही, त्यावर उपाय योजना शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच समस्या अतिवृद्ध, दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहचता येत नव्हते, त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर त्यांना घरूनच मतदान करता येईल, अशी व्यवस्था तयार केली आहे. त्यानुसार यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) मध्ये सुमारे २३ हजार २५६ मतदार घरबसल्या मतदान करू शकणार आहेत.
घरून मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून राज्यभरातून 28 मार्चपर्यंत 85 वयावरील जेष्ठ नागरिकांपैकी 17 हजार 850 मतदारांचे निवडणूक आयोगाकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच 40% दिव्यांगत्व असलेले 5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्चपर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत. राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे.
48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम
या समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् म्हणाले. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656 Flying Squad Team (FST) व 2096 Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यामध्ये या निवडणुकीसाठी 98 हजार 114 इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत 28 मार्चपर्यंत 27,745 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच 190 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली 557 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community