संजय राऊत किती कोटींचे मालक?

134

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर अनेकांकडून त्यांच्या बेनामी संपत्तीचा पाढा वाचला जात आहे. पण, एका दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि खासदार असलेले राऊत कागदोपत्रीही कोट्याधीशच आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. बँकेत राऊतांच्या नावे बऱ्याच ‘एफडी’ असून, मुंबईसह अलिबागमध्ये त्यांच्या आणि पत्नीच्या नावे भूखंड, सदनिका असल्याची नोंद आहे.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘आपली छत्री आपणच रंगवा’ कार्यशाळेचे आयोजन)

संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्तीचा तपशील जाहीर केला होता. त्यानुसार, त्यांच्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपयांची रोकड आणि बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये जमा आहेत. शिवाय ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रुपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षांत त्यांनी २७ लाख ९९ हजार १६९ रुपयांची कमाई केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

किती जमीन नावावर?

अलिबागमध्ये राऊतांच्या नावावर तीन प्लॉट आहेत, तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकर जमीन आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक सदनिका आहे. शिवाय भांडुप आणि आरे वसाहतीत घर असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पत्नीकडे किती संपत्ती?

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोने दागिन्यांच्या स्वरुपात आहे. त्याची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रुपये आहे. त्याशिवाय १ हजार ८२० ग्रॅम चांदी असून, त्याची किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत वर्षा राऊत यांची कमाई २१ लाख ५८ हजार ९७० इतकी होती. दादरमध्ये वर्षा राऊत यांच्या नावे एक सदनिका आहे. त्याची सध्याची किंमत ६ कोटी ६७ लाख रुपये आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे व्यावसायिक मालमत्ताही आहेत. त्यांची एकूण किंमत ५ कोटी ५ लाखांच्या घरात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.