संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येचा खटला बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणीसाठी बुधवारी, २६ मार्चला आला. त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा या दोन गोष्टींवर अवलंबून असणार आहे.
मनुष्य खोटे बोलू शकतो, पण परिस्थिती कधीही खोटे बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने एसआयटीने केलेला तपास आणि पुरावे अत्यंत चांगले आहेत, असेही निकम म्हणाले. या सुनावणीसाठी बीडच्या मकोका न्यायालयात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यावेळी युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्येच्या सर्व घटनांचा तपशील न्यायालयासमोर मांडला. या सुनावनीस आरोपींचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे आणि आनंत तिडकेही उपस्थित होते. उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्येतील वाल्मिक कराडच्या सहभागाचा आणि खंडणी प्रकरणाचा संबंध न्यायालयासमोर स्पष्ट केला. आता न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी घेणार आहे.
(हेही वाचा Judiciary : न्यायव्यवस्थेविषयी अवमानकारक टिपण्णी केल्याप्रकरणी निरंजन टकलेंवर गुन्हा दाखल)
संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच होते. त्यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community