मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौ-यावर असून शनिवारी त्यांनी नाशिकच्या मालेगाव येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतानाच धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यात झालेल्या घटनांबाबत देखील आपण लवकरच बोलणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
योग्यवेळी बोलणार
धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे काही झालं आहे त्याचा मी साक्षीदार आहे. सिनेमातून मी फक्त उदाहरण दिलं आहे पण धर्मवीरांच्या प्रत्यक्ष जीवनात काय झालं ते मला माहीत आहे. योग्यवेळी मी त्याबाबत नक्की बोलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः खरी गद्दारी आणि विश्वासघात कोणी केला? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
धर्मवीर सिनेमाला मिळालेलं यश काहींना रुचलं नाही
धर्मवीर आनंद दिघे यांच्या सिनेमाला 18 पारितोषिकं मिळाली. बाळासाहेबांनाही हेवा वाटायचा इतकं महान कार्य आनंद दिघे यांनी केले आहे. धर्मवीर सिनेमाच्या माध्यमातून आम्ही आनंद दिघे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण काही जणांना ते रुचलं नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
आम्हाला जनतेचा पाठिंबा
बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू निहार ठाकरे यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या आहेत. स्मिता ठाकरे यांनीही माझी भेट घेतली आहे. राज्याच्या कानाकोप-यातून आज आम्हाला समर्थन मिळत आहे. जर आम्ही गद्दारी केली असती तर हे सगळे आमच्यासोबत आले नसते, लोकांनी आम्हाला बघून तोंड फिरवली असती, पण आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘ज्या दिवशी मी बोलेन तेव्हा भूकंप होईल’, मुलाखतीवरुन मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा)
Join Our WhatsApp Community