सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. संजय शिरसाट हे सुरुवातीपासूनच शिंदे गटात सामिल होते, मात्र असे असूनही त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यातच शिरसाट यांनी शुक्रवारी केलेल्या ट्वीटमुळे ते नाराज असल्याची चर्चा सर्वत्र आहे. आता या सर्व गोष्टींवर संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. मी शिंदे यांच्यासोबतच आहे. मंत्रीपदाचा अंतिम निर्णय शिंदेच घेतील. तसेच मला मंत्रीपद हवे आहे, तशी इच्छा मी शिंदेंकडे बोलल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले.
संजय शिरसाट यांचे ट्वीट
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. ट्विट सोबतच विधानसभेतले उद्धव ठाकरेंचे एक भाषणदेखील त्यांनी जोडले होते. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीटदेखील केले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा होती. आता या ट्वीटबाबत संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे ट्वीट ड्राफ्टमध्ये सेव्ह होते. ते तांत्रिक चुकीमुळे ट्वीट झाले. माझा शिंदेंवर मंत्रीपद देण्यासाठी कोणताही दबाव नाही, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.
( हेही वाचा: वाटप केलेल्या ४० लाख ध्वजांपैकी साडेचार लाख ध्वज सदोष, तरीही लोकांच्या हाती पडले…)
मंत्रीपदासाठी मी भुकेलेला नाही
मंत्रीपदासाठी दबाव आणताय का? असे विचारसे असता शिरसाट म्हणाले की, माझा स्वभाव तसा नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही. मंत्रिपदासाठी मी भूकेलेला नाही. ज्या ठिकाणी चुकते त्यावेळी बोलायला हवे. मला जे योग्य वाटते ते मी स्पष्टपणे बोलतो. मंत्रिपद मिळाले किंवा नाही मिळाले हा विचार माझ्या डोक्यात कधीच येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. तसेच, शिरसाट म्हणाले की मातोश्रीवर बोलावले तर परत जायचे की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील. शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सहमत असू, असे शिरसाट म्हणाले. जर तुम्ही कुटुंबप्रमुखांची भूमिका बजावत असाल तर त्यावेळी कुटुंबाचे मतही जाणले पाहिजे. ते कुटुंबप्रमुख राहिले असते, त्यांना आम्ही मानतही आहोत.