भिडे, एकबोटेंना ओळखत नाही! चौकशी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष

97

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विषयी आपण वर्तमानपत्रात वाचले आहे, मात्र त्यांना आपण व्यक्तिशः ओळखत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगासमोर सांगितले.

विशेष म्हणजे या हिंसाचारानंतर शरद पवार यांनी हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे  कारणीभूत आहेत, असा आरोप केला होता. त्यामुळे राज्य सरकारने या हिंसाचाराच्या चौकशीसाठी अयोग स्थापन केला. ‘मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी वढू बुद्रुक याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती स्थापन केली, याची कल्पना तुम्हाला आहे का?, असा प्रश्न पवार यांना आयोगाकडून विचारण्यात आला. यावर ‘मी प्रतिज्ञापत्रावर जे काही म्हटले तेवढेच मला बोलायचे आहे’, असे उत्तर दिले. कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेबाबत मला प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधूनच कळले, असेही पवार म्हणाले.

(हेही वाचा मौलवींचा मोठा निर्णय! मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान)

चौकशीच्या दिशेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले 

शरद पवार यांनी हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबतही त्यांना चौकशी आयोगासमोर प्रश्न विचारण्यात आला. ‘कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या आधी एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेला तपास हा पोलिस खात्याला काळिमा आहे, असे वक्तव्य आपण प्रसारमाध्यमांत केले होते, ते बरोबर आहे का?’ असे पवार यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘एल्गार परिषदमध्ये जे लोक उपस्थित नव्हते त्यांनाही पुणे पोलिसांनी आरोपी केले, हे चुकीचे आहे, असे मी बोललो होतो.

एसआयटी नेमण्यास पवारांनीच सांगितले

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि पुणे पोलिसांनी त्याबाबत केलेला तपास याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमावी, असे मत आपण मांडले होते का? या प्रश्नावर पवार यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेबाबतची माहिती मला प्रसारमाध्यमांवरील बातम्यांमधून कळली, हे खरे आहे. तसे मी माझ्या ऑक्टोबर-२०१८च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. पुणे ग्रामीणमध्ये शिक्रापूर पोलीस ठाणे आणि पिंपरी पोलीस ठाणे अशा दोन ठिकाणी गुन्हे नोंद झाल्याची माहिती मला कळाली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.