काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. परंतु काँग्रेस हा फॉर्म्युला मान्य करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून यावरून जागावाटपाच्या वेळी मविआत धुसफूस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मविआत जिंकून येण्याचा निकष ठरविण्याचे संकेत दिले आहेत, पण जागावाटपात मुंबईत ठाकरे गटाचे सूत्र मान्य होणार की, काँग्रेस सवतासुभा मांडणार, हे जागावाटपाच्या बैठकीतूनच स्पष्ट होणार आहे.
(हेही वाचा-Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना जामीन)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४-१-१ असेच मविआचे सूत्र ठरू शकते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यात दक्षिण मुंबईत पुन्हा अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तसेच उत्तर- पश्चिम मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना याच मतदारसंघातून मैदानात उतरविण्याचे संकेतही ठाकरे गटाने दिले आहेत. त्यामुळे येथे थेट पिता-पुत्रातच लढत पाहायला मिळू शकते.
यासोबतच दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघावरही ठाकरे गट दावा सांगण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर ईशान्य मुंबईतून विद्यमान राज्यसभा खासदार संजय राऊत यांनाही मैदानात उतरविले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात असून, मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत. येथेही ठाकरे गटच मैदानात उतरू शकतो.