एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली कारवाई ही शिस्तभंगाची कारवाई आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटाला जाऊन मिळतील, हे वृत्त खोटे आहे. राज्यात नवे सरकार, नवीन विटी, नवीन दांडू, असे म्हणत राऊतांनी नवनिर्वाचित सरकारला टोला लगावला. तसेच, मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबावही होता, पण मी गेलो नाही, असा खळबळजनक खुलासाही राऊत यांनी केला.
राज्यातील जनता आणि शिवसैनिक दुधखुळे नाहीत
शिंदे समर्थकांकडून पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला जात आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण आपल्या शिवसैनिकाला फसवले, अशी भावना निर्माण होत असेल. त्यातूनच हे सगळे सुरु आहे. लोकांना भ्रमिष्ट केले जात आहे. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक तसे करत आहेत. शेवटी या राज्यातील जनता आणि शिवसैनिक दुधखुळे नाहीत, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: एकनाथ शिंदे यांची आता सोशल मीडियातही “शिंदेशाही” )
उपमुख्यमंत्री म्हणणे जड जातेय
देवेंद्र फडणवीस यांच्यामागे उप असा शब्द लावायला मला जड जात आहे. माझ्या तोंडात अजून उपमुख्यमंत्री हा शब्द बसला नाहीये. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. तरीही देवेंद्रजींच्या संदर्भात असं काही होत असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community