मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावा आणि औरंगाबाद येथील जाहीर सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसी येथे 14 मे रोजी सभा होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसेना नेते रामदास कदम यांना निरोप दिला आहे. मात्र हा निरोप मुख्यमंत्र्यांकडून आला असल्याची जाहीर कबुली रामदास कदम यांनी दिली. तरीही मी त्या सभेला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निमंत्रणानंतरही नाराजी कायम असून उद्धव ठाकरेंच्या सभेकडे रामदास कदमांची पाठ असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे रामदास कदमांनी म्हटले आहे.
(हेही वाचा- “राज ठाकरेंची ‘पदवी’ ढापण्याचा प्रयत्न कराल तर…”, मनसेचा सेनेला इशारा)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची चर्चा होती. तर त्यांना दसरा मेळाव्यासाठी पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे कदम यांच्या विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत पक्षाकडून अद्याप कोणताही विचार झालेला नाही, त्यामुळे रामदास कदम हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.
काय म्हणाले रामदास कदम?
शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला १४ मे रोजीच्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणं आलं आहे. मात्र, त्या सभेला मी उपस्थित राहणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं रामदास कदम यांनी सष्ट केलं. गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा निरोप रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ दिला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी लिहिलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कदम बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार गजानन कीर्तिकर, शेकापचे जयंत पाटील, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, इतिहास संशोधन मंडळाचे डॉ. सतीश कदम आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community