मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन करताना म्हटले की, जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता असताना सरकारने मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने ग्राह्यही ठरवला.
पण, आपल्याला माहितच आहे सुप्रीम कोर्टाचा वेगळा निर्णय आला. हे कोणाच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. न्यायालयात राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढत आहे. त्यासाठी नामवंत वकील आणि घटनातज्ज्ञांची फौज शासनाने उभी केली आहे… हा मुद्दा घटनात्मक असल्यामुळे काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत केलेली आहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ व तज्ज्ञ वकीलांचा टास्क फोर्स स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. आपण सर्वजण समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करीत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
- मराठा समाज देखील अत्यंत शांततेने आपल्या हक्कांसाठी लढत आहे. या समाजाने जवळपास ५८ इतके मोर्चे राज्यभरात काढले. ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचे होते. अत्यंत प्रामाणिकपणे आणि नेटाने हे मोर्चे काढले जात होते. कुठेही त्याला गालबोट लागले नाही. परंतु, काही स्वार्थी राजकीय नेते मराठा तरुणांच्या आडून आपला स्वार्थ साधत आहेत.
- माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – Navi Mumbai Police: अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई; नवी मुंबईत सहा परदेशी महिलांना अटक, २ कोटींचं ड्रग्ज जप्त)
विरोधकांनी खतपाणी घालू नये –
सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या व आता विरोधात असलेल्या नेत्यांनीसुद्धा अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे काम करू नये, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही मंडळी आहेत, जे स्वतःला मराठा समाजाचे नेते समजतात, त्यांनी आजवर केवळ मराठा समाजातील विशिष्ट वर्गाच्या हिताला प्राधान्य दिलं. राज्यभर गरीब मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्याकडे मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. परंतु आता अचानक मराठा समाजाचा कळवळा घेऊन त्यांनी राजकरण सुरू केले. परंतु अशा पद्धतीने मराठा तरुणांच्या भावनांशी खेळून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community