शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग दिले जाईल, अशा चर्चा होत्या. मात्र, ठाकरे-पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनाच पहिल्या पसंतीच्या नियुक्त्या देऊन शिंदेंनी धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. त्यामुळे या बदल्यांमागील गुपित काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
गुरुवारी उशिरा राज्यातील ४४ सनदी (आयएएस) आधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा करण्यात आली. या यादीवर देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंची छाप अधिक दिसून आली. शिवसेना फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांशी जुळवून घेत, त्यांना पहिल्या पसंतीच्या नियुक्त्या देऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर, किंबहुना त्यांच्या संमतीनेच बदल्यांची घोषणा झाल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
संजय राऊतांचे व्याही नवी मुंबईचे आयुक्त
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कडवट टीका करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांना साईड पोस्टिंग दिले जाईल, अशा चर्चा होत्या. मात्र, त्यांच्याकडे नवी मुंबई पालिकेची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचे कारभारी कोण?
२४ जून २०२० रोजी विपीन शर्मा यांना ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तेवर येताच आपल्या बालेकिल्ल्याची जबाबदारी अभिजीत बांगर यांच्या हाती दिली आहे. बांगर आधी नवी मुंबईचे आयुक्त होते.
( हेही वाचा : “एक नेता, एक झेंडा, एक मैदान”… ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर लाॅन्च; पहा व्हिडीओ )
महत्त्वाच्या बदल्या खालीलप्रमाणे:
- मनीषा पाटणकर-म्हैसकर – प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग
- मिलिंद म्हैसकर – प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क
- मिलिंद बोरीकर – मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ
- डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे – प्रधान सचिव, उद्योग विभाग
• वल्सा नायर – प्रधान सचिव, गृहनिर्माण
• दीपक कपूर – अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग
• प्रवीण दराडे – सचिव, पर्यावरण विभाग
• दीपेंद्र सिंह कुशवाह – विकास आयुक्त,उद्योग
• अशोक शिनगारे – जिल्हाधिकारी, ठाणे
• विवेक एल. भीमनवार – परिवहन आयुक्त
• जयश्री एस. भोज – माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, तसेच महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार
• राजेश नार्वेकर – महापालिका आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका
• अभिजीत बांगर – ठाणे महापालिका आयुक्त
• डॉ. विपिन शर्मा – मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई
• सौरभ विजय – सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग
• डॉ. अनबलगन पी. – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी