कोरोना आणि मतदार याद्यांमधील सुधारणा आदी कारणांमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे. परंतु महापालिकेची ही सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलणे ही तशी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांसाठी योग्य असून, कोरोना काळात या निवडणूका झाल्यास, शिवसेनेसोबतच भाजप विरोधातील लाट मोठ्या प्रमाणात पसरलेली पहायला मिळणार आहे. परंतु ही निवडणूक पुढे न ढकलावी अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांची असून भाजप ही निवडणूक पुढे ढकलू नये याच भूमिकेत आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला घेता येण्यासारखा असून, निवडणूक वेळेवर घेतल्यास काँग्रेससाठी ती लाभदायी ठरण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक पुढे जाण्याची शक्यता
एकेकाळी मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप युतीला टक्कर देण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षामध्ये होती. परंतु मागील दहा वर्षांमध्ये काँग्रेसचे मुंबईतील अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या शिवसेना आणि भाजप हे दोन पक्षच सध्या जनतेसाठी पसंतीच्या रडारवर आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर तसेच यासाठी आवश्यक असलेल्या निवडणूक प्रक्रियेला लागणारा अवधी लक्षात घेता, राज्य सरकारला मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ रोजी होणारी संभाव्य सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडूनही ही निवडणूक ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर पुढील काही महिने सुरू राहिल्यास ही निवडणूक निश्चितच सरकारला पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी लागली तर या महापालिकेला प्रथम सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल आणि पुढे ज्याप्रमाणे प्रक्रियेला विलंब होईल त्याप्रमाणे त्याची मुदतवाढ वाढवली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आाहे.
(हेही वाचाः …तर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कालावधी ७ वर्षांचा)
म्हणून शिवसेनेला २०२२ मध्येच हवी निवडणूक
सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असून, भाजप विरोधी बाकावर आहे. मात्र, कोरेानामुळे जनता त्रस्त असून कोणत्याही प्रकारे मतदानाचा विचार जनतेच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे मतदान झालेच तर केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधात जनक्षोभ मतपेटीतून व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीला मुदतवाढ देणे हे शिवसेना आणि भाजप यांच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर निवडणुका घेतल्यास याचा फटका भाजपला जास्त बसेल. जर त्यांना ३० टक्के फायदा होणार असेल तर शिवसेनेला ६० टक्के फायदा होईल. त्यामुळे भाजप विरोधातील लाट लक्षात घेऊन ही निवडणूक नियोजित वेळेतच घेतली जावी. जेणेकरुन भाजपला त्याचा जास्त फायदा मिळणार नाही. परंतु याबाबत कॅबिनेटमध्ये जरी निर्णय घेतला तरी राज्यपाल हे त्यांचे आहेत. ते याबाबतचा अध्यादेश जारी करतील, याचीही भीती शिवसेनेला वाटू लागली आहे.
भाजप केव्हाही तयार
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कुठल्याही पक्षासाठी अनुकूल वातावरण नसले तरी ही महापालिकेची निवडणूक आहे. ही पक्षाच्या चिन्हाबरोबरच व्यक्ती स्तरावर लढली जाते. भाजपचे ८६ नगरसेवक हे कायमच ऑनफिल्ड राहिलेले आहेत. तसेच जिथे आमचे नगरसेवक नाहीत तिथेही जिल्हाध्यक्ष, विधानसभा संघटक, वॉर्ड संघटक सक्रिय आहेत. आम्ही निवडणुकीसाठी जनतेची कामे करत नाही, निवडून आल्यापासून आमची कामे सुरुच आहेत. त्यामुळे ही निवडणूक वेळेवर होणेच योग्य आहे. शिवसेनेने ज्याप्रकारे लसीकरणाची पेरणी केली आहे, त्यामुळे ते ही निवडणूक पुढे ढकलणार नाहीत. तरीही केव्हाही निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः शिवसेना-भाजपचं सूत जुळतंय… सलग दुसऱ्यांदा एकत्र!)
शिवसेना, भाजपचा कमी होऊ शकतो आकडा
महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी त्यांचे मुंबईतील अस्तित्त्व फारसे नाही. परंतु वेळेवर निवडणुका घेतल्यास याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेलाही होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या ज्याप्रकारे त्यांची नगरसेवकांची सदस्य संख्या आहे, ती दुप्पटीने किंवा तिप्पटीनेही वाढू शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे नियोजित वेळेत निवडणूक झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसाठी ती लाभदायी ठरू शकते व शिवसेना आणि भाजपचा आकडाही कमी होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना आणि भाजपसाठी ही निवडणूक लांबणीवर जाणेच फायदेशीर असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसाठी ही वेळेवर होणेच योग्य ठरणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्याचा निर्णय जेव्हा कॅबिनेटमध्ये घेतला जाईल, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community