देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. त्याच्या भाग्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे होते त्यामुळे ते झाले. त्यांना तसा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर विरोधी पक्षनेते असताना करावा, राज्याची बदनामी होणार नाही, याकडे पहावे. त्यांच्या ललाटी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य असेल तर ते होतील, पण म्हणून त्यांनी त्यासाठी आक्रस्ताळपणा करू नये, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
भाजपविषयी द्वेषभावना नाही!
आमच्या मनात कुणाविषयी द्वेष भावना नाही. भाजपचे नेते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा अथवा विरोधी पक्षनेते यांच्या प्रति द्वेष अजिबात नाही. त्यांच्या मनात द्वेष आहे का, हे मात्र माहित नाही. राजकारणात कुणाशी वैर नसते. तशी ती संस्कृती आहे, असेही राऊत म्हणाले.
पवारांचे कार्यक्रम रद्द!
एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी, २८ मार्चपासून तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र सोमवारी त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड झाली, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना काही संसर्ग झाला असल्याने एन्डोस्कोपी करून छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शरद पवार यांची तब्येत खालावल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथे जाणार होते, मात्र आता ते तिथे जाणार नाहीत. पवार यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडली होती, मात्र आता त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड झाली आहे. पवार हे आमच्यापेक्षा तरुण नेते आहेत. ते यातून लवकर बरे होतील आणि पुन्हा आमच्यासोबत कामाला लागतील, असा विश्वास शिवसेना नेते राऊत यांनी व्यक्त केला.
पवार-शहा भेट गुप्तच!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली, ती गुप्तच आहे. त्याविषयी मला माहित आहे, पण मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्या भेटीत काय चर्चा झाली कुणालाच माहित नाही. शेवटी गुप्त असे काही नसते, उलट जे गुप्त म्हणून आपण म्हणतो तेच आधी जाहीर होत असते. पहाटेची शपथविधी ही खरी गुप्त आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल! काय आहे नेमके कारण? )
सरकार टिकणार!
हे सरकार तिन्ही पक्ष एकत्र येऊन स्थापन झाले आहे. काही कमिटमेंट देऊन सरकार झाले आहे. सरकार ५ वर्षांचा काळ पूर्ण करेल, त्याबाबत शंका नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
देशमुख ऍक्सिडेंशियल गृहमंत्रीच!
अनिल देशमुख यांनी अतिशय उत्तमपणे अडचणीच्या काळात गृहमंत्री पद सांभाळले आहे. त्याविषयी दुमत नाही. पण तीन पक्षांचे सरकार असल्याने कदाचित काही अडचणी येत असतील, पण ते त्यातून शिकतील. देशमुख यांना गृहमंत्री पद हे ऍक्सिडेंशियलच मिळाले आहे. देवेगौडा हेदखील ऍक्सिडेंशियलच पंतप्रधान झाले होते. आमचे सरकारही ऍक्सिडेंशियलच आले आहे. वयाच्या २८व्या वर्षी मला सामानाचे संपादक पद मिळणे हेही ऍक्सिडेंशियलच होते. त्यामुळे याकडे चांगल्या अर्थाने पहावे, हा काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार नाही. वाझे हे सरकारसाठी त्रासदायक ठरतील हे मी याआधीच सरकारमधील नेत्यांशी बोललो होतो, पण त्यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे होते. देशमुख ज्या पदावर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच, शिवसेनाप्रमुखांचे सर्व आयुष्य टीका सहन करण्यात गेले, उद्धव ठाकरे टीकेचे घाव सहन करत आहेत, त्यामुळे देशमुखांवर टीका झाल्याने त्याचा इतका गवगवा करण्याची गरज नाही, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community