शिंदे गटाला मनसेत विलीन व्हायचे असेल तर स्वागतच – राज ठाकरे

224

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकनाथ शिंदे गटातील ४० आमदार सामील होतील, अशी चर्चा माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकिवात येत होती, प्रत्यक्षात तसा प्रस्ताव आपल्यापर्यंत आला नाही, तरीही असा प्रस्ताव आला तर त्याचा मी विचार नक्की करेन, त्यांचे स्वागतच आहे. हे आमदार मनसेत आले तर मनसेतील मूळ कार्यकारी आणि पदाधिकारी यांच्याशी अजिबात दुजाभाव करणार नाही, मी महाराष्ट्रासाठी हा निर्णय घेईन, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली. झी २४ तास वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.

माझ्या विरोधकांकडून अपप्रचार

राज ठाकरे कार्यक्रम अर्धवट हाती घेतात हा विरोधक माझ्याविरोधात कायम करत असलेला अपप्रचार आहे. टोलचे आंदोलन मी केले, ६५ टोलनाके बंद केले, त्याचे श्रेय देणार नाही का. मुंबईतील टोल सत्तेत आल्यावर ते तुम्ही का बंद केले नाहीत? मनसेने भोंग्याचा मुद्दा घेतल्यावर ४० टक्के भोंगे बंद झाले ना, पहाटेचे अजान बंद झाले ना, असे राज ठाकरे म्हणाले.

प्रत्येक पक्षाला फुटाफुटीला सामोरे जावे लागते 

शरद पवारांचे ५४ आमदार निवडून आले होते आणि ते सगळे निघून गेले होते, प्रत्येक पक्ष मोठा होत असतो, तेव्हा त्यांना फुटाफुटीचे धक्के सहन करावे लागले आहेत. माझे मुंबई महापालिकेतील ६ नगरसेवक फुटून गेले, एकच आमदार राहिला अशी स्थित्यंतरे सगळ्या पक्षात आली आहेत. १९५२ ते २०१४ पर्यंतचा काळ जनसंघ अर्थात भाजपाला देशात संपूर्ण सत्ता आणायला लागला. शिवसेनेचेही तसेच आहे. प्रत्येक राजकीय पक्ष संघर्ष करत असतो, मला वडील, आजोबा, काकांच्या विचारांचा वारसा लाभला आहे, तो मोठा आहे, त्यातून मला लाभच होणार आहे. सत्तेसाठी लोक फुटतात, लोकांनी या लोकप्रतिनिधींना मतपेटीतून शासन केले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा उद्धव ठाकरे विश्वासास पात्र नाही! राज ठाकरे यांचा घणाघात)

मी बाळासाहेबांच्या विचारांचा आव आणत नाही

माझे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे, परंतु मी त्याचा आव आणत नाही, आव आणणे आणि दिखाऊपण करणे यातील फरक लोकांना समजतो. मी हिंदुत्वाची भूमिका भाजपामुळे घेतली हे म्हणणे चुकीचे आहे. मी पक्ष काढला तेव्हा शरद पवारांमुळे मी पक्ष काढला अशीही वावडे उठवली गेली. अशा वावड्या उठवणारी माणसे ही त्यांचीच असतात आणि त्यांचीच माणसे मोठी होण्याचा प्रयत्न करत असतात. मग भाजपने का भोंग्याचा मुद्दा उचलला नाही. दुकानांवरील मराठी पाट्यांकरता मनसेने जेव्हा आंदोलन केले, अल्टिमेटम दिला तेव्हा पाट्या बदलायला लागल्या. मोबाईलवरही मोबाईलच्या कंपन्या मराठीत बोलू लागल्या, हे मनसेमुळे झाले. रेल्वे आंदोलनामुळे हजारो मराठी मुलांना नोकऱ्या लागल्या आहेत, म्हणून विचार जगणे गरजेचे आहे. मी बहासाहेबांचा विचार जगात आहे, असेही राज ठाकरे यांनी ठासून सांगितले.

हिंदू ही संस्कृती

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी काही बोलले, म्हणून त्यांना माफी मागायला लावली आणि इथे तो हरामी ओवैसी किती बोलतो त्याला कधी माफी मागायला लावली का? हिंदू हा फक्त हिंदू – मुसलमान दंगलीत तो हिंदू असतो, १५ ऑगस्टला तो राष्ट्रभक्त असतो, चीनने हल्ला केला कि तो संभ्रमित असतो कोण म्हणूनव्यक्त व्हायचे हे त्याला समजत नाही. मग तो मराठी होतो, एकदा मराठी झाला की तो कुणबी, मराठा, ब्राह्मण होतो. मला एकदा कायस्थ पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्यासाठी आग्रह धरला होता. त्यात मी शेवटी म्हटले आहे की, सर्व जातीत सगळ्यात आवडणारी गोष्ट ही खाद्य संस्कृती. प्रत्येक जातीतील आजींनी ही खाद्य संस्कृती लिहून ठेवली पाहिजे. अनेक वर्षे आपल्यावर आक्रमणे झाली तरी आपल्याकडे स्त्रियांनी साडी नेसणे, कुंक लावणे, मंगळसूत्र घालणे सोडून दिले का, तर नाही. म्हणजे हिंदू ही संस्कृती आहे. आणि जेव्हा धर्माच्या नावाखाली गळे चिरण्याच्या गोष्टी येतात, तेव्हा ते अधिक घाबरलेले असतात, कारण ते मानतात ‘तो’ संपला तर ‘ते ‘संपतील, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांच्या नावावरून मुसलमानांनी सुरु केलेल्या धर्मांध कृत्यांवर टीका केली.

(हेही वाचा शरद पवारांकडून पुन्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका)

मुंबई महापालिकेत सत्ता आली तर जे तुम्ही पाहिले नाही ते करून दाखवेन! 

आपण हिंदू आहोत, यात हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद अशा फोडी झाल्या आहेत, माझ्या धर्मावर नख लावले, तर मी हिंदू म्हणून अंगावर येईन आणि माझ्या भाषेवर हल्ला कराल, तर मी मराठी म्हणून नख लावेन, असे मी म्हणतो. पण हिंदूंनी धर्मांध होता काम नये, तर धर्माभिमानी होणे गरजेचे आहे. मातोश्री ही एक वास्तू आहे, विषय शिवसेना या संघटनेचा आहे. जो त्या संघटनेचा संस्थापक होता तो माणूस आज हयात नाही आणि त्यांचा विचारही आज संघटनेत नसेल, तर मग हळहळ व्यक्त करण्यात काय उपयोग? महापालिकेत मनसेची सत्ता आली, तर मी जे तुम्ही मुंबईत पाहिले नाही, ते करून दाखवेन आणि त्यात काय काय असेल ते जाहीरनाम्यात येईलच, असेही राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.