औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी राज ठाकरेंवर कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद मधील सभेला ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या, त्यावेळीच कळालं होतं की, हे सारं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्र सैनिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करतील, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.
मनसेकडून राज्य सरकारला इशारा
जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल)
१६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन
मिशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या विरुद्ध औरंगाबाद येथील चिथावणीखोर भाषणासंदर्भात आजच औरंगाबाद येथे गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी वर्तवली होती. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यापूर्वीच औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. ही सभा होण्यापूर्वी पोलिसांनी तब्बल १६ अटी घातल्या होत्या त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना अढळून आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर कारवाई करू, असा इशारा देखील देण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community