जर शिवसेनेला फटका देण्यासाठी, शह देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले असेल, तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, हा घटनेचा अपमान आहे, मंत्रिमंडळाचा अपमान आहे, तसेच राणे यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, त्यांना जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम खाते दिले आहे, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत, असा टोला संजय राऊत यांनी हाणला.
राणे आता देशभरात रोजगार वाढवतील!
पंतप्रधान मोदी यांनी ज्यांना मंत्री बनवले त्यांची क्षमता पाहूनच त्यांना मंत्री पद दिले असणार, अशी आशा आहे. जर कुणीतरी सेनेला शह देतो म्हणून, ममता बॅनर्जी यांना शह देतो म्हणून, त्यांना मंत्रीपदाची खिरापत वाटली जात असेल, तर हे चुकीचे आहे. मंत्रिपद हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी दिले जाते. त्याचा वापर त्यासाठी केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना संधी दिली, त्याना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. त्याआधारे ते देशभरात आणि राज्यातही रोजगार वाढवतील. लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग बंद पडले आहेत, रोजगार कमी झाले आहेत, त्यामध्ये ते वाढ करतील, अशी अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : नारायण राणेंना लघु, मध्यम उद्योग मंत्रालय!)
कपिल पाटील, भारती पवार राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट!
मंत्रीमंडळात रविशंकर, प्रकाश जावडेकर अशा अनुभवही मंत्र्यांना बाहेर काढून नवीन चेहरे आणण्यात आले आहेत. ज्या रविशंकर यांना ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून म्हटले जायचे त्यांच्यावरच मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ पडला आहे. आरोग्य, शिक्षण, रेल्वे खात्यात नवीन चेहरे दिले आहेत. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community