वाघाशी दुश्मनी नव्हतीच! नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू! भाजपची सेनेला ऑफर 

दिल्लीतील भेटींमुळे राज्यात चर्चा सुरु झाली आहे. त्यात किती तथ्य आहे माहित नाही. पण जरी यदाकदाचित सेनेसोबत सरकार आले तरी निवडणूक मात्र आम्ही स्वतंत्र लढवू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, त्यात काय चर्चा झाली याची माहिती नाही. पण आमची वाघाशी कधीच दुश्मनी नव्हती, आमच्या नेत्यांची आज्ञा असेल तर आम्ही वाघाशी दोस्ती करू. उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींशी नातेसंबंध आहेत, त्यांनी कधी देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांच्याशी नातेसंबंध आहेत, असे म्हटले नाही. जर ते संबंध असते तर १८ महिन्यांत आमचे सरकार आले असते, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

(हेही वाचा : चहावाल्याने दिले मोदींना 100 रुपये… का? वाचा)

… जरी सेनेसोबत सरकार आले तरी!

दिल्लीतील भेटींमुळे राज्यात चर्चा सुरु झाली आहे. त्यात किती तथ्य आहे माहित नाही. पण जरी यदाकदाचित सेनेसोबत सरकार आले तरी निवडणूक मात्र आम्ही स्वतंत्र लढवू, असेही पाटील म्हणाले.

आरक्षणावरून जनक्षोभ उसळणार! 

कोरोनावरून सरकारने जे प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे मराठा समाज शांत आहे. हे प्रतिबंध काढताच हा समाज प्रक्षुब्ध होणार आहे, हा सरकारला इशारा आहे. आता ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्यातील कुणीतरी सर्वोच्च न्यायालयात गेला आणि ओबीसींची लोकसंख्या तेवढी नाही जेवढे त्यांना आरक्षण दिले जात आहे, अशी भूमिका मांडली. कोर्टाने १३ तारखा दिल्या. प्रत्येक वेळी ओबीसींची लोकसंख्या कळवा सांगितले, पण सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे न्यायालयाने वैतागून हे आरक्षण रद्द केले. यात केंद्राचा काय दोष? देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही अनेकदा सरकारला याविषयी जागरूक केले होते, पण सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here