शिवसेना या चार शब्दांमागे एक विचार आहे, शक्ती आहे. त्यामुळे असा एकही माणूस नसेल जर शिवसेनेला मानणारा नसेल. मतदान ही बाब अलाहिदा, पण शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्काकरता लढण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी भाषा या मुद्दयावरून हिंदुत्वाच्या दिशेने कुच करत राष्ट्रीयत्वाकडे कधी वाटचाल केली हे समजले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६मध्ये शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी या मुंबईवरच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रात, देशात दबदबा निर्माण करत सातासमुद्रा पलिकडे परदेशातही आपली भुरळ पाडली होती. तब्बल ४६ वर्षे मराठी माणूस आणि तमाम हिंदुंच्या ह्दयात स्थान मिळवणाऱ्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली शिवसेना संघटना आत पक्षांत रुपांतर झाल्यानंतर त्यात फुटीची बिजे रोवून जी आज शिवसेना दुभंगली गेली, ते पाहून प्रत्येक मराठी माणूस आज हळहळत आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर हा पक्ष हिंदुत्वापासून लांब होत असला तरी प्रत्येक हिंदुंना आपलासा वाटणारा हा पक्ष होता, तो फुटताना पाहुन प्रत्येक हिंदुंना यातना होत आहे. ज्यादिवशी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेसाठी आघाडी केली त्यादिवशी शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्दयावर प्रतारणा केली आणि जनतेच्या मनातील आपले स्थान कमी केले. तरीही या पक्षाप्रती असलेला मनातील ओलावा काही कमी झालेला नाही. एक हिंदुत्वावादी अशाप्रकारे फुटला याचे सर्वांत दु:ख जर कुणाला असेल तर ते हिंदुस्थानी माणसाला असेल. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना बदलत चालली आणि बदलत्या प्रवाहात ते आपले विचार आणि तत्वांनाही विसरत गेले याची खंत कुठे तरी जुन्या निष्ठावान शिवसैनिकाला वाटत आहे.
( हेही वाचा :‘फक्त वीट येऊन चालणार नाही, वीट हाणावी लागेल’, मुख्यमंत्री संतापले )
… तर त्यांनी या आघाडीला नकारच दिला असता
खरं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली होती, तेव्हा कुठलाही विचार ते स्वत: घेत नसत आणि कुणी सांगितला म्हणून घेत नसत. संघटनेचे एकात्मिक निर्णय घेण्यासाठी बाळासाहेबांनी आपले अष्ठप्रधान मंडळ बनवले. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, लिलाधर डाके आदींच्या अष्टप्रधान मंडळाशी सल्लामसलत केल्याशिवाय, त्यांचे विचार ऐकल्याशिवाय बाळासाहेब कधीही संघटनात्मक निर्णय घ्यायचे नाही, हा शिवसेनेचा इतिहास आहे. पण बाळासाहेबांच्या पश्चात अशाप्रकारे अष्टप्रधान मंडळ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे,असे दिसून येत नाही. बाळासाहेबांचा अष्टप्रधान मंडळ, तर उध्दव ठाकरे यांचे एकप्रधान मंडळ असाच कारभार आहे. खासदार संजय राऊत हे एकमेव प्रधान शिवसेनेचे असून उध्दव ठाकरे हे यांच्याशिवाय कुणाचेही ऐकत नाही. पक्ष किंवा संघटना हा कोणा एकाच्या विचाराने चालत नसतो, तर काय बरोबर आणि काय चुकीचे तसेच त्याचे दूरगामी परिणाम काय याचा विचार करून निर्णय घेण्याकरता म्हणून बाळासाहेबांनी अष्टप्रधान मंडळाची कायमच मदत घेतली होती. पण जे बाळासाहेबांच्या राजगादीवर बसल्यानंतर उध्दव ठाकरे यांना याचा विसर पडला किंबहुना त्यांचा कुणावरही विश्वास नव्हता असाच याचा अर्थ होता. आज शिवसेने जुन्यांपैकी सुभाष देसाई, लिलाधर डाके, मनोहर जोशी,दिवाकर रावते,चंद्रकांत खैरे, अनंत गीते, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, अनिल परब, रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर यांच्यासारखी मंडळी आहे. पण संजय राऊत यांच्यावरच पूर्ण विश्वास टाकून घेण्याचा निर्णय उध्दव ठाकरेंना सत्तेच्या राजमार्गापर्यंत पोहोचवणारा असला तरी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विचार पुढे आला होता, तेव्हा जर बाळासाहेबांसारखे उध्दव ठाकरेंचे अष्टप्रधान मंडळ असते तर त्यांनी या आघाडीला नकारच दिला असता. एकवेळ विरोधी पक्षात बसू आणि आपली ताकद दाखवू, पण असंगाशी संग नको असेच म्हटले असते. शेवटी मुद्दा हा उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा असेल, तर तिथे राजापुढे प्रधानांनाही झुकावं लागतं. मग तो राजा रयतेचा असू शकत नाही. बाळासाहेबांनी जनतेला डोळयासमोर ठेवून संघटना मोठी केली, तर उध्दव ठाकरे यांनी स्वहित पाहून निर्णय घेतले. त्यामुळेच त्यांना आपल्या निर्णयात अडथळा आणणारे अष्टप्रधान मंडळ नको होते, राऊत यांच्यासारखे एकप्रधान मंडळच त्यांना आपलेसे वाटू लागले.
पण आज शिवसेनेचा जो घात झाला तो याच कारणामुळे. कधी कधी राजाला स्वहितापेक्षा प्रजेचा हित पाहणे आणि त्यादृष्टीकोनातूनच निर्णय घेणे योग्य असते, तोच न्याय संघटना चालवताना अध्यक्षांना लागतो. आज उध्दव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि मुलाला मंत्री बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केली. पण यात संघटनेला काय मिळाले? स्वत:कडे मुख्यमंत्रीपद घेत मुलाला आणि मातोश्रीच्या जवळ असलेल्या सुभाष देसाई यांच्यासह अनिल परब यांना मंत्रीपद दिले. दोन मंत्रीपद ठाकरे कुटुंबात आणि दोन मंत्रीपद मातोश्रीच्या जवळ असलेल्या दोघांना देऊन एकट्या मुंबईतच जेव्हा चार मंत्रीपदाची खिरापत वाटून मागील मंत्रीमंडळातील अनेकांना डावलले गेले आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली नाही, तिथेच खरं तर असंतोषाची ठिणगी पडली होती. आमदार फुटून जातील या भीती आम्ही आघाडीत करून सत्तेत सामील झालो असे जरी शिवसेना पक्षप्रमुख सांगत असले तरी आज जे काही फुटले यापेक्षा वेगळी नाचक्की झाली नसती. आज ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३८ आमदार गेले आहेत, ते काही मुर्ख आहेत का? त्या सर्वांच्या मागे ईडी आहे का? त्यातील एक-दोन प्रकरणे बाजुला काढली तरी बाकीचे आमदार का गेले. कारण पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे संघटनेचे नेतृत्व करायला सक्षम होते, तेवढे सक्षम सरकार चालवताना दिसत नव्हते. पक्षप्रमुख म्हणून जे आपल्या आमदारांना भेटत होते, ते मुख्यमंत्री बनल्यानंतर भेटत नव्हते. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आल्यावर प्रत्येक आमदार आपल्या विभागात मोठ्याप्रमाणात विकास करायची स्वप्न पाहत असतो. पण इथे फक्त आदित्य ठाकरे यांच्या विभागातच आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदारांना जास्त निधी जाणार असेल तर शिवसेनेच्या आमदारांनी यापेक्षा वेगळे पाऊल काय उचलावे अशी पक्षाची अपेक्षा आहे. जर पक्षात युवा सेना लुडबूड करत असेल तर मग ज्येष्ठ नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी युवा सेनेच्या दबावाखाली झुकत काम करायचे का? त्यांना सांगून कामे करायची का? त्यामुळे ही जी काही खदखद आहे ती एक ते दोन दिवसांमधील नसून अडीच वर्षांमधील ही खदखद आहे. त्याचा अशाप्रकारे स्फोट होईल असे वाटले नव्हते. तरीही या घटनेतून धडा घेत जनताभिमुख निर्णय संघटनेकरता घेता आला नाही तर यापेक्षा दुदैव दुसरे नसेल.
पुढे काय करायचंय याचं आत्मचिंतन करायला हवं
शिवसेनेने आजवर अनेक झटके आणि धक्के पेलले. मग ते बंडू शिंगरे, माधव देशपांडे असो किंवा त्यानंतर छगन भुजबळ, गणेश नाईक, संजय निरुपम, नारायण राणे,राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे असे फुटले असले तरी आता ही फूट पडली आहे ती उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवणारी आहे. आज फुटले ते आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. ते कुठल्याही पक्षात सामील झाले नाही. त्यामुळे आता असली शिवसेना कुठली आणि नकली शिवसेना कुठली हा प्रश्न उपस्थित झाला. रामाच्या जन्मस्थळावर जाताना असली यहाँ है, नकली घर पे बैठा है अशाप्रकारे बॅनरबाजी करण्यात आली होती. आता शिवसेनेचा असली चेहरा कोण आणि असली शिवसेना कुणाची हेच आता सिध्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांनी आपण अडीच वर्षात कुठे चुकलो आहोत आणि पुढे काय करायचंय याचं आत्मचिंतन करायला हवं, एवढंच आम्हाला वाटतंय.
Join Our WhatsApp Community