गृहमंत्र्यांच्या मतदार संघातच बैलगाडा शर्यत! कायद्याची ऐशी तैशी

169
सध्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली नाही. तरीही खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघात कायदा धाब्यावर बसवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या मुहूर्तावर या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली.

पोलिसांच्या उपस्थितीत शर्यत 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा घाटात भंडाराची उधळण करत बैलगाडा मालकांसह तरुणाईने इथे गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदार संघात बैलगाडा शर्यत भरली होती. विशेष म्हणजे कायद्याचे उल्लंघन होत असतानाही पोलिस काहीच कारवाई करत नव्हते, त्यांची याला मूकसंमती होती.

पडळकरांना केलेला विरोध 

दरम्यान राज्य सरकार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, याचा निषेध म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी परस्पर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र त्याला राज्य सरकारने विरोध केला होता. पोलिसांनी आदल्या दिवशी बैलगाडा शर्यतीचे मैदान खोदले होते. असे असताना दुसरीकडे शुक्रवारी, ५ नोव्हेंबर रोजी खुद्द गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच बैलगाडा शर्यतीचे आयोजन झाले तरी पोलिस आणि राज्य सरकारने काहीच कारवाई का केली नाही, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.