महात्मा गांधीच्या स्मृतीदिनी भाषण देताना, रविवारी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या म्हणण्याऐवजी ‘वध’ असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे नाना पटोलेंना मनोरुग्णालयात पाठवायला हवं, असं वक्तव्य भाजपाचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहित, नाना पटोले यांना तातडीने पदावरुन बरखास्त करा अशी मागणी केली आहे. सोबतच अशी व्यक्ती काॅंग्रेसची प्रतिमा मलिन करत आहे, असही त्यांनी म्हटले आहे.
हा लोकशाहीचा संस्कार
भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले, तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे, हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे.
सतत अवमान करणारं वक्तव्य
पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधाने केली आहेत. या विधानांमुळे समाजमन संतप्त आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे समाजातील सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया आली. पटोले यांचा सर्वांनीच तीव्र निषेध केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे, असं पटोले यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा फटका! १० महापालिकांवर प्रशासक? )
म्हणून तातडीने बरखास्त करा
तसेच, “या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफी देखील मागितलेली नाही. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्षाची ही विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे. पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यावर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून आपणास करीत आहे.” असं देखील बावनकुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community