जिल्ह्यातील लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांमधील काही गावांमध्ये गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हाताशी आलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
अनेक बागांमध्ये आंबा काढणीला आलेला
सध्या आंब्याच्या पिकाचा मोसम सुरू झाला आहे. अनेक बागांमध्ये तो काढणीला आला आहे, अन्य ठिकाणी मोहोर किंवा बारीक कणीच्या स्वरूपात आहे. यापैकी तयार आंब्यासाठी हा पाऊस त्रासदायक नाही, पण इतर अवस्थांमध्ये असलेला आंबा गळण्याचे किंवा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.
(हेही वाचा फडणवीसांना पोलिसांची नोटीस, कोणती आहेत कलमे, किती शिक्षा होऊ शकते?)
आंब्यावर कीडरोग पसरण्याची शक्यता
सध्या हापूसची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. पावसामुळे हे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या बदललेल्या वातावरणामुळे आंब्यावर कीडरोग पसरण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात यापूर्वीही एकदा मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. याआधीही कोकणातील अवेळी पावसामुळे अनेकदा आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षे लॉकडाऊन होता, त्यावेळी दळणवळण बंद होते, त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते, आता अवकाळी पावसाने कोकणातील आंबा उत्पादकांचे नुकसान होणार आहे.
Join Our WhatsApp Community