पहिल्या दिवशी परिषदेतही गाजले हे महत्वाचे मुद्दे

यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

80

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आजचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरुन विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. मंगळवारी सभागृहात या विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यावर सविस्तर चर्चा करायला परवानगी दिली जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी मात्र यावर आक्षेप घेत आजच चर्चा घडवून आणा, अशी मागणी लावून धरली. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

आजंच चर्चा घडवा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी कोणताही स्थगन प्रस्ताव घेणार नाही. मात्र, २८९ नुसार चर्चा घडवून आणू, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुरुवातीला सभागृहाला स्पष्ट कल्पना दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे बोलू लागले. मात्र, मराठा आरक्षणाबाबत माहीत असलेले मुद्दे पुन्हा मांडून सभागृहाचा वेळ घेऊ नका, नवीन काही मांडायचे असेल, बोलायचे असेल तर त्याबद्दल बोला, अशी समज सभापती निंबाळकर यांनी वारंवार दिली. मात्र मेटे यांनी बोलणे सुरुच ठेवत विषय भरकटवल्याने सभापतींनी वार्षिक अहवाल मांडण्याची परवानगी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मेटे आणि भाजपच्या सदस्यांनी व्हेलमध्ये येत सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे कामकाज चालवणे कठीण झाल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

(हेही वाचाः निलंबनानंतर फडणवीस आणि निलंबित आमदारांचा संताप! काय आहेत प्रतिक्रिया?)

दोनदा सभागृह तहकूब

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरुनही भाजप सदस्यांनी गदारोळ घातला. ग्रामविकास मंत्री सतेज पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सभागृहात निवेदन देत केंद्र सरकारने राज्य सरकारला मागास प्रवर्गाची सर्व माहिती (इम्पेरिकल डेटा) तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी शिफारस विधान परिषदच्यावतीने केंद्र सरकारला करत आहे, असे सांगितले. मात्र, यावरही प्रविण दरेकर आणि गोपीचंद पडळकर यांनी हरकत घेत, यावर आजच चर्चा घडवून आणा, अशी आग्रही मागणी केली. मात्र, या महत्त्वाच्या विषयांवर सरकार मंगळवारी प्रस्ताव सादर करुन भूमिका मांडणार आहे. त्यामुळे त्यावर मंगळवारी बोलू, असे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र, सभागृहाचे इतर कामकाजही महत्त्वाचे आहे, असे सांगून पुढील कामकाजाला सुरुवात केली. भाजप सदस्यांनी व्हेलमध्ये येऊन पुन्हा गदारोळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी दुसऱ्यांदा तहकूब करावे लागले.

(हेही वाचाः अधिवेशनात ‘राडेबाजी’! भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.