येत्या आगामी वर्षात होणाऱ्या उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडसह पाच राज्यातील निवडणुका होणार की नाही याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत निवडणूक आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना आणि कोरोनाचा नवा व्हेरिय़ंट ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटाचा आढावा घेण्यात येणार असून कोरोनाच्या वाढत्या फैलावादरम्यान, पाच राज्यातील निवडणुका घ्यायच्या की लांबणीवर टाकायच्या याचा निर्णय ही या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकांचं भवितव्य अधांतरी
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायायलाने केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाला निवडणूका पुढे ढकलण्यावर विचार करावा असे सुचित केले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष असून ही बैठक महत्त्वाची असणार आहे. आगामी वर्ष 2022 मध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या निवडणुका होणार असून उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह या नेत्यांच्या निवडणूकपुर्व सभाही सुरु झाल्यात. तर नुकतीच मोदींनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोव्यात सभा देखील घेतली. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा मे महिन्यात संपणार आहे. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूरचा कार्यकाळ हा मार्च महिन्यात संपणार आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने या निवडणुकांचं भवितव्य अधांतरी असून निवडणुकांवर टांगती तलवार आहे.
(हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?)
निवडणूकपुर्व तयारीचा आढावा घेतला जाणार
आजच्या बैठकीत निवडणूक आयुक्त तसेच आरोग्य मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या पाच राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत गोवा, पंजाब, मणिपूर ह्या राज्यांचा दौरा करुन तिथल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे. आता उत्तर प्रदेशचा दौरा करुन निवडणूकपुर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे